बिबट्या दिसल्याने फटाके वाजवले तर दुसऱ्या बिबट्याने...

नवनाथ भेके
Monday, 10 August 2020

आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील लायगुडेमळ्यात शनिवारी रात्री एक आणि रविवारी सकाळी दोन भल्या मोठ्या बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे ग्रामस्थ भितीच्या छायेखाली वावरत आहेत.

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील जवळे येथील लायगुडेमळ्यात शनिवारी रात्री एक आणि रविवारी सकाळी दोन भल्या मोठ्या बिबट्यांचे दर्शन झाले. त्यामुळे ग्रामस्थ भितीच्या छायेखाली वावरत आहेत. बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने  पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठ्यात एवढ्या टक्क्यांनी वाढ

जवळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्लेही वाढले आहेत. मागील काही दिवसात दिलीप लायगुडे यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला केला, तर बोराटेमळ्यात दोन शेळ्या बिबट्याने ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी (ता. ८) रात्री १० वाजता किरण खालकर हे आपल्या मोटारीतून लायगुडेमळ्याच्या रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या रस्ता ओलांडून दीपक लायगुडे यांच्या डाळिंबाच्या बागेत गेला. या परिसरात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच, रविवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शिंदेमळ्यात उत्तम शिंदे यांना बिबट्या दिसला. त्यावेळी त्यांनी फटाके वाजवले असता अजून एका बिबट्याचे दर्शन झाले. दिवसाही बिबट्या दिसू लागल्याने नागरिकांनी धसका घेतला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी प्रविण खालकर, नीलेश शेळके व किरण खालकर यांच्यासह
नागरिकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of Ambegaon taluka fear leopard