अजित पवारांमुळे बारामतीकरांमध्ये अस्वस्थता

मिलिंद संगई
Saturday, 28 September 2019

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर बारामतीकरांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

बारामती : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर बारामतीकरांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

अजित पवार यांनी नेमका कशामुळे राजीनामा दिला याची कोणालाच माहिती नसल्यामुळे आणि अजित पवार आहेत कुठे याचीही कोणाला माहिती नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सह समस्त बारामतीकरांमध्ये सध्या चर्चेचा एवढा एकच विषय आहे.

Vidhan Sabha 2019 : अजित पवार घेणार राजकीय संन्यास?

अनेक आमदार खासदार यांनी देखील बारामतीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून अजित पवार यांच्या राजीनाम्या मागची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी कोणालाही या राजीनाम्याची कल्पना दिली नव्हती हे समोर येत आहे.

दरम्यान अजित पवार यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी बारामतीकर त्यांच्यासोबत असतील असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय व अजित पवार यांच्या निवडणुकीच्या कामकाजाची जबाबदारी ज्यांच्यावर असते असे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी देखील फेसबुक वर एक पोस्ट टाकून अजित पवार यांनी आता निर्णय जनतेवर सोपवावा, अजित पवार हे बारामतीकरांचे आहेत, त्यांनी इतक्या वर्ष समाजकारणात बारामतीकरांसाठी काम केलेले असल्यामुळे आता अजित पवारांनी काय करायचे हे बारामतीकरांना ठरवू द्या, असे प्रेमाचे आवाहन केले आहे.
किरण गुजर यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, दादा... तुम्ही अत्यंत भावनाशील आहात आपल्यामुळे कोणीही दुखावले जाऊ नये याची काळजी घेत असताना, तुम्ही सगळ्यांचीच मने जपली... बऱ्याच वेळा मनाला मुरड घालुन जवळच्यानाही गप्प बसवून बाजूला ठेवून बाकीच्यांची मने सांभाळलीत.... तुम्ही कायमच साहेबांचा आदर करीत आला आहात, काही झाले तरी साहेबाना दुखावले जाणार नाही, या साठी मला कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल या बाबत तुम्ही कायमच ठाम आहात. 

Video : अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार, म्हणतात...

सार्वजनिक जीवनातून तुम्ही बाजूला जाऊ शकत नाही ,काही व्यक्ती या समाजासाठी असतात, नव्हे त्यांचा जन्मच लोकसेवेसाठी असतो हा इतिहास आहे त्यामुळे तुम्ही आता तुमच्या पुरते नाहीत तर सर्व समाजाचे बारामतीकरांचे आहात तुम्ही तालुक्यावर निस्सिम प्रेम करता आहात, त्या मुळे आता तालुक्यातील जनतेला ठरवू द्या समाजाला ठरवू दया की दादांनी काय करायचे ते. तो आता आमचा हक्क, अधिकार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: citizens of baramati get depressed due ajit pawar legislature resignation