धूर, दुर्गंधीने पिंपरी शहरातील नागरिक त्रस्त

धूर, दुर्गंधीने पिंपरी शहरातील नागरिक त्रस्त

पिंपरी- घरोघरचा कचरा उचलला जातोय. वाहने व मजूर पुरेसे आहेत. मोठ्या गृहसोसायट्यांचे स्वतःचे कचरा निर्मूलन प्रकल्प आहेत. रस्त्यांची साफसफाई रोज केली जाते. तरीही, रस्त्याच्या कडेला कचरा दिसतोच. धूर, दुर्गंधी, डास आणि कुत्रे, डुकरांच्या उपद्रवाचा नागरिकांना त्रास होतोय. कारण, लोकसंख्या वाढतेय, जीवनशैली बदलतेय, शहरीकरण व औद्योगीकरण वाढतेय, परिणामी कचराही वाढतोय, त्यामुळे शहराच्या आरोग्याचे आणि महापालिकेच्या नियोजनाचे गणितही बिघडलंय.

शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, सौंदर्यात भर पडावी, देश व राज्य पातळीवर स्वच्छता मोहिमेत नावलौकिक व्हावा, यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या सहभाग वाढीसाठी स्वच्छता ॲप विकसित केले आहे. सोसायट्यांमधील कचरा निर्मितीच्या ठिकाणीच जिरवायचे धोरण राबवले. त्याला शंभरावर सोसायट्यांचा प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्याकडून कचरा संकलनाचे प्रमाण घटले. तरीही शहरातील रस्त्यांवर कचरा दिसतो. कारण, अनेक जण रस्त्याच्या कडेला कचऱ्याची पिशवी भिरकावून निघून जातात. काही जण कचरा पेटवून देतात. त्यामुळे धुराचा त्रास होतो. रस्त्यांवर कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू असूनही प्रमाण घटलेले नाही. परिणामी, कचऱ्याची समस्या भेडसावते आहे. 

सात महिन्यांत तब्बल २३३ टन कचरा निर्मिती वाढली आहे. मात्र, संकलन व वाहतुकीसाठी एप्रिल प्रमाणेच ३०० घंटागाड्या, ४४ कॉम्पॅक्‍टर, ६३ ट्रीपर, दोन ट्रॅक्‍टर व २३ अन्य वाहने आहेत. 

कचऱ्याचे प्रकार सहा
घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, संस्थात्मक, कृषी-पशुपालन आणि वैद्यकीय कचरा निर्माण होतो. यात घरगुती, मंडई व हॉटेलमधील कचऱ्याचे प्रमाण ७० टक्के आणि व्यावसायिक व बाजारपेठेतील कचऱ्याचे प्रमाण ३० टक्के आहे. हॉटेलमधील ओला व रुग्णालयांतील जैववैद्यकीय कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जातो. तरीही, अनेकदा रस्त्याच्या कडेला असा कचरा दिसतो. 

घातक कचरा रस्त्यावर
गेल्या आठवड्यात स्पाइन रस्त्यावर जाधववाडी कॉर्नर परिसरात टाटा मोटर्स कंपनी सुरक्षा भिंतीलगतच्या पदपथावर वैद्यकीय कचरा टाकलेला होता. त्यात सिरींज, इंजेक्‍शन, मलमपट्ट्या, औषधे व इंजेक्‍शनच्या रिकाम्या बाटल्या, ड्रेसिंगसाठी वापरलेला कापूस होता. नागरिकांच्या तक्रारीनंतर जैववैद्यकीय कचरा संकलन वाहनातून तो नेला.

कचरानिर्मिती (टनांमध्ये)
एप्रिल २०१८- ८३७ 
एप्रिल २०१९  - ९१६
नोव्हेंबर २०१९   -११५० 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com