१९ नागरी सुविधा केंद्र पिंपरी शहरात बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने शहरात ६९ नागरी सुविधा केंद्रे सुरू केले होते. मात्र, अकार्यक्षम १९ केंद्र बंद केली आहेत. यातील बहुतांश केंद्र समाविष्ट गावे व रेडझोन परिसरातील असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

पिंपरी - नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने शहरात ६९ नागरी सुविधा केंद्रे सुरू केले होते. मात्र, अकार्यक्षम १९ केंद्र बंद केली आहेत. यातील बहुतांश केंद्र समाविष्ट गावे व रेडझोन परिसरातील असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. 

दरम्यान, आणखी ४९ केंद्र सुरू करण्यासाठी मागविलेल्या अर्जांमधून केवळ सहाच अर्जदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे आवश्‍यक ४३ व बंद केलेले १९ अशा ६२ केंद्रांची शहराला आवश्‍यकता आहे. अग्निशामक, आकाशचिन्ह परवाना, वृक्षसंवर्धन, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, नवीन नळजोड, रहिवासी दाखला आदी १८५ प्रकारच्या सेवासुविधांच्या मागणीसाठी नागरी सुविधा केंद्रातून नागरिकांना अर्ज करता येतो. महापालिकेच्या ३२ प्रभागांमध्ये पहिल्या तीन टप्प्यांत ६९ केंद्र महापालिकेने सुरू केले. त्यातील १९ केंद्रचालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ते बंद केले. 

साधारणतः एक किलोमीटर चौरस क्षेत्रासाठी एक नागरी सुविधा केंद्र असावे, असा नियम आहे. एका केंद्रातून महिन्याला किमान २० अर्ज महापालिकेकडे प्राप्त होणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून १९ केंद्रांकडून अत्यल्प प्रतिसाद होता. त्यामुळे ते केंद्र बंद केल्याचे महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी सांगितले. 

ते म्हणाले, ‘‘पहिल्या टप्प्यात १५ नागरी सुविधा केंद्र सुरू केले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात  २८ व तिसऱ्या टप्प्यात २६ केंद्र सुरू केले होते.’’

अर्जासाठी २० रुपये शुल्क
नागरी सुविधा केंद्रातर्फे अर्ज करताना नागरिकांकडून केंद्र संचालकाने केवळ २० रुपये प्रतिसेवा शुल्क आकारणे आवश्‍यक आहे. त्यातील १५ रुपये शुल्क स्वतःकडे ठेवून पाच रुपये महापालिकेकडे जमा करायचे असतात. नव्याने मंजूर केलेल्या सहा केंद्र संचालकांसोबत तीन वर्षांचा करार केला जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Civic Facilities Center closed in Pimpri city