लाॅकडाउननंतर बारामतीत नववी ते बारावीचे वर्ग होणार सुरु पण...

मिलिंद संगई
Sunday, 22 November 2020

अनेक शाळांनी येत्या दोन तीन दिवसांत आपापल्या शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. नगरपालिकेनेही काही शाळा सॅनिटाईझ करण्यास प्रारंभ केला आहे.

बारामती : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या कोरोना तपासण्या निगेटीव्ह आल्यानंतर जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याचे संमतीपत्रक भरुन देतील, त्या शाळा व महाविद्यालये सुरु केले जातील, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय जाधव यांनी आज दिली.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

बारामती तालुक्यातील नववी ते बारावीपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांची संख्या 1284 इतकी असून ही बातमी लिहीपर्यंत (रविवारी ता. 22 दुपारी अडीच वाजेपर्यंत) 390 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्या पैकी फक्त दोघे जण कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली. 

बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय, रुई ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दररोज किमान 180 शिक्षकांच्या तपासण्या करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले असून त्या नुसार काम सुरु आहे. ज्या शाळांमधील शिक्षकांचे रिपोर्ट निगेटीव्ह असतील त्या शाळा सुरु करण्याचे आज तरी नियोजन असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

बारामती शहर व तालुक्यातील परिस्थिती तुलनेने बरी आहे, मोठ्या संख्येने तपासण्या होत असतानाही रुग्णसंख्येचे प्रमाण पाच टक्क्यांहून कमी असल्याने ही बाब दिलासादायक असल्याचे डॉ. मनोज खोमणे म्हणाले. 

दरम्यान अनेक शाळांनी येत्या दोन तीन दिवसात आपापल्या शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून नगरपालिकेनेही काही शाळा सॅनिटाईझ करण्यास प्रारंभ केला आहे. पालकांची संमतीपत्रके भरुन घेतल्याशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार नसल्याने ज्या पालकांची मुलांनी शाळेत जाण्यासाठी संमतीपत्रके मिळणार नाही, अशा मुलांना शाळात प्रवेश दिला जाणार नाही. 

प्रारुप शाळांनीच तयार करण्याचे निर्देश...
एकाच वेळेस किती विद्यार्थ्यांना बोलावायचे, किती मुलांना एका वर्गात बसवायचे या सह इतर शासकीय निर्देश असले तरी परिस्थिती पाहून शाळाचालकांनी या बाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आल्याने शाळानिहाय काही बदल होऊ शकतात. 

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र
शाळाच का लक्ष्य होतात...
विद्यार्थी व पालक पर्यटनासह इतर कामासाठी पुण्यामुंबईसह गोवा महाबळेश्वरच्या वा-या करत आहेत, खरेदीसाठी बाहेर पडत आहेत, इतरही कामे केली जात आहेत, असे असताना गर्दीत वावरताना तेथेही कोरोनाचा धोका आहेच, असे असताना मग फक्त शाळा सुरु करण्याच्या वेळेसच नकारात्मक भूमिका काही जण का घेतात, असा सवाल काही संस्थाचालकांनी नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर केला. शाळा सुरु होणे आता गरजेचे असल्याचे अनेकांचे मत आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Classes IX to XII will start in Baramati after lockdown says sanjay jadhav