माठांच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ

संदीप जगदाळे
बुधवार, 28 मार्च 2018

हडपसर - उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे थंड पाण्यासाठी माठांची मागणी वाढली आहे. परंतु. गरिबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची किंमत यावर्षी २० ते २५ टक्कयांनी वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. विजेशिवाय नैसर्गिक पद्धतीने आरोग्यदायी थंड पाणी मिळत असल्याने सामान्यांचा माठ खरेदीकडे कल असतो. यावर्षी माती, मजूरी, भट्टी लावण्यासाठी लागणारे सरपण आदींच्या किमती वाढल्याने नाईलाजाने माठांच्या किंमती वाढविल्याचे कुंभार वाड्यातील पिढीजात व्यावसायिकांचे मत आहे. 

मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावार्षी १५ ते २० टक्क्यांनी माठांची मागणी वाढली आहे. दिवसेंदिवस माठ तयार करण्यासाठी लागणारी माती तसेच इतर साहित्य मिळत नसल्याने परिसरातील कुंभारांनी माठ बनविण्याचा व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. तर दुसरीकडे गुजरात, पंढरपूर, लातूर, सोलापूर, बार्शी, राजस्थान येथून माठ विक्रीला येत आहेत. वाहतूक खर्च अधिक असल्याने त्यांच्या किमतीही जास्त आहेत. 

नागरिक संजय गवते म्हणाले, उन्हामध्ये घशाची कोरड घालविण्यासाठी थंड पाणी पिण्यावर भर असतो. फ्रीजच्या पाण्यामुळे घशाला त्रास होत असल्याने माठातील पाणी पिण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळे उन्हामध्ये थंड पाणी मिळावे यासाठी सर्वच मंडळी माठ खरेदी करतात. एकेकाळी कुंभारवाड्यात जाऊन माठ खरेदी करावे लागत होते, परंतु आता माठ विक्रेते रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली फिरून माठांची विक्री करत असल्याचे दिसत आहेत. 

व्यावसायीक रामदास कुंभार सांगतात, कच्च्या मालाबरोबर इतर वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. लाल माती, पोयटा माती, भाजणीचा सर्व खर्च आणि माठ तयार करण्यासाठी लागणारे मजूर त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माठांच्या किमतीमध्ये वाढ करावी लागली आहे. माठ विकण्याचा हंगाम ठरावीक काळापुरताच म्हणजे उन्हाळ्यापुरातच मर्यादित असतो. त्यामुळे थोड्या दिवसात जास्त माठ तयार करावे लागतात. सध्या लहान माठांच्या किमती १०० रुपयांपासून पुढे आहेत. यावर्षी उन्हाचा तडाखा वाढल्याने माठ खरेदीसाठी गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी माठांची किंमत वाढली असली तरी विक्री देखील दुपटीने वाढली आहे. सध्या बाजारात १००, १५०, २००, २५०, ३०० रुपयां पर्यंत माठ मिळत असल्याचे माठ व्यावसायिकाने सांगितले.

Web Title: clay water pot prices hiked by 20 percent