हजारो हातांकडून अस्वच्छतेशी ‘दोन हात’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पुणे - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, जि. रायगड) आयोजित देशव्यापी स्वच्छता अभियानांतर्गत शहर व परिसरात बुधवारी सकाळी आठ ते अकरा या तीन तासांत ८४७० सदस्यांकडून ५०६.८ टन इतका कचरा उचलण्यात आला. 

पुणे - डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, जि. रायगड) आयोजित देशव्यापी स्वच्छता अभियानांतर्गत शहर व परिसरात बुधवारी सकाळी आठ ते अकरा या तीन तासांत ८४७० सदस्यांकडून ५०६.८ टन इतका कचरा उचलण्यात आला. 

ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त हे अभियान दरवर्षी राबविण्यात येते. स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापौर प्रशांत जगताप, नगरसेवक विशाल तांबे, स्मिता वस्ते, ॲड. गायत्री खडके, तसेच घनकचरा उपायुक्त सुरेश जगताप, डॉ. केतकी घाटगे, डॉ. दिनेश बेंडे यांच्या उपस्थितीत सारसबागेजवळ या स्वच्छता अभियानाचा प्रारंभ झाला. शिवाजीनगर न्यायालय परिसर, महापालिका इमारत, क्षेत्रीय कार्यालये, महावितरण, बीएसएनएल आदी सरकारी कार्यालये, येरवडा मनोरुग्णालय, ससून हॉस्पिटल, बी. जे. मेडिकल, तसेच पालिका रुग्णालये, पोलिस ठाणे असा सुमारे ५८ हजार ६७० चौरस मीटरचा कार्यालयीन परिसर स्वच्छ करण्यात आला. प्रतिष्ठानतर्फे हात मोजे, झाडू, मास्क, तसेच कचरा उचलण्याचे साहित्य पुरविण्यात आले. शहर व परिसरातील १६४ किलोमीटर लांबीचे दुतर्फा रस्ते या अभियानांतर्गत स्वच्छ केले गेले. 
 

‘प्रतिष्ठान हीच ओळख...’
हातात झाडू घेऊन स्वयंस्फूर्तीने रस्त्यांवर उतरलेले प्रतिष्ठानचे हजारो सदस्य पाहून अनेक नागरिकांनीही या अभियानात स्वेच्छेने सहभाग नोंदवला. या वेळी जो तो आपले नाव, गाव विसरून ‘प्रतिष्ठान हीच आमची ओळख आणि प्रतिष्ठान हेच आमचे नाव’ या प्रेरणेने भारावून जाऊन स्वच्छता करण्यात गढून गेला होता.

Web Title: cleaning campaign