सफाई कामगार महिलेचा शिक्षणाचा ध्यास 

प्रवीण खुंटे 
शुक्रवार, 1 जून 2018

दहावीची परीक्षा 1998 मध्ये पास झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. मात्र, शिकण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी हे यश संपादन केले आहे. पुढे जाऊन त्यांना वकील व्हायचे आहे. 

पुणे - महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या पौर्णिमा गोठे यांनी तब्बल वीस वर्षांनंतर बारावीची परीक्षा देत पहिल्या प्रयत्नात पास होण्याची किमया साधली आहे. दहावीची परीक्षा 1998 मध्ये पास झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणात खंड पडला होता. मात्र, शिकण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी हे यश संपादन केले आहे. पुढे जाऊन त्यांना वकील व्हायचे आहे. 

मंगळवार पेठेतील आंबेडकरनगरमध्ये दहा-बाय-दहाच्या खोलीत दोन मुलगे व आई-वडिलांसोबत त्या राहतात. अडचणीतून मार्ग काढत संसार कसाबसा सुरू होता. मात्र, 2013 मध्ये पतीचे निधन झाले. दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. महापालिकेत सफाई कामगार म्हणून त्या कामाला लागल्या. तेव्हाही मनात शिकण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. पण, या वर्षी धैर्य करून बारावी वाणिज्य शाखेचा बाहेरून अर्ज भरला आणि परीक्षा दिली. 

याबाबत पौर्णिमा गोठे म्हणाल्या, ""मला शिकण्याची प्रबळ इच्छा होती. मात्र, आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यामुळे रोज जेवणाची भ्रांत असायची. आम्ही चार बहिणी आहोत. त्यामुळे आई-वडिलांनी माझे सोळाव्या वर्षीच लग्न लावून दिले. पुढील शिक्षणासाठी सासरी विरोध होता. म्हणून शिक्षण थांबले, पण शिकण्याची इच्छा थांबली नाही. '' 

आई पास, मुलगा नापास 
पौर्णिमा यांना दोन मुलगे आहेत. मोठा मुलगा दर्शन दहावीच्या परीक्षेत नापास झाला आहे. मात्र, आईला मिळालेल्या यशामुळे त्यालाही  अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली आहे. पुढील परीक्षेत मी खूप अभ्यास करून, पास होऊन दाखवीन. मला माझ्या आईचा अभिमान वाटतो, असे त्याने सांगितले. 

माझ्यासारख्या अनेक महिला आहेत, ज्यांना इच्छा असूनही शिकता येत नाही. पण, मी त्यांना एकच सांगू इच्छिते, की जिद्द सोडायची नाही. काही झालं, तरी हार मानायची नाही. आपल्याला अनेक गोष्टी येत असतात, पण आपण त्या करत नाही. 
-पौर्णिमा गोठे 

Web Title: Cleaning workers women After twenty years pass the HSC examination