#MondayMotivation मानलं या हिरकणीला! चिमुकलीला घेऊन केले बारा किल्ले सर! (व्हिडिओ)

snehal-gharde
snehal-gharde

पिंपरी - लग्न, मुले, संसार म्हटले, की आता एवढेच पुरे असे म्हणत आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालत महिला तडजोड स्वीकारतात. पण काही महिला त्या पलीकडे जाऊन धाडस दाखवतात. भटकंतीची आवड जोपासण्यासाठी चिमुकलीला सोबत घेऊन वर्षभरात बारा गड किल्ले सर करण्याचा संकल्प चिंचवडमधील गिर्यारोहक स्नेहल घरडे यांनी पूर्ण केला. त्यासाठी त्यांनी आयबीएमसारख्या कंपनीच्या सल्लागारपदाचा राजीनामाही दिला. 

स्नेहल आणि त्यांचे पती आदिनाथ घेरडे हे दोघेही मूळचे व्हॉलिबॉलपटू. लग्न झाल्यावर दोघांनाही निसर्गात भटकंतीची सवय लागली. दर शनिवारी आणि रविवारी हे दोघे निसर्गात फिरायला जात असत. जनरल मोटर्समध्ये काही काळ व्यवस्थापक म्हणून जबाबदारी सांभाळल्यावर स्नेहल यांनी हिंजवडी येथील आयबीएम कंपनीत सल्लागार म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. नोकरी आणि घर सांभाळतच त्यांनी भटकंती सुरूच ठेवली. मुलगी स्वानंदीचा जन्म झाल्यावर भटकंतीत खंड पडू नये, यासाठी स्नेहल यांनी तिलाही सोबत घेण्याचे ठरविले. त्यानंतर तिला पाठीवर घेत वर्षभरात 12 किल्ले सर केले. 

स्नेहल म्हणाल्या, ""गर्भारपणाच्या काळात बहुतेक महिलांना खाण्याचे डोहाळे लागतात. परंतु, स्वानंदीच्या वेळेस मला फिरण्याचे डोहाळे लागले. अनेक मोहिमांमध्ये गिर्यारोहकांना पाठीवर आवश्‍यक साहित्य घेऊन जावे लागते. त्यामुळे पाठीवर वजन घेऊन चढाई करण्याचा सराव स्वानंदी हिने घडवून आणला. त्यासाठी जर्मन बनावटीचे महागडे "बेबी कॅरियर' खरेदी केले. वर्षभरात 12 गड किल्ले सर करण्याचा संकल्प सोडत जानेवारीत भोर तालुक्‍यातील रायरेश्‍वरापासून सुरुवात केली. त्यानंतर सप्टेंबरचा अपवाद वगळता प्रत्येक महिन्यात एक अशी चढाई केली. त्यामध्ये तुंग, तिकोना, मल्हारगड, राजमाची, लोहगड, पन्हाळा, पुरंदर, हरिश्‍चंद्रगड, विसापूर, प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग यांचा समावेश राहिला. त्यापैकी राजमाचीचा "नाईट ट्रेक' होता. आता या पुढेही निसर्गातील भटकंती चालूच ठेवणार आहे.'' 

मेरी कोम चित्रपटामधून मिळाली प्रेरणा 
स्नेहल यांना मुष्टियुद्ध जगज्जेती मेरी कोम हिच्यावरील चित्रपटापासून प्रेरणा मिळाली. लग्न आणि मुले झाल्यावर जीवन बदलते. नोकरी आणि मुलाबाळांचा सांभाळ करून आवड जपणे कठीण जाते. परंतु, प्रत्येक महिलेने स्वतःचे मीपण जपले पाहिजे. क्रीडाच नव्हे तर चित्रकला, संगीत, गायन यापैकी कुठली तरी आवड जोपासा,'' असे मतही स्नेहल घरडे यांनी प्रदर्शित केले. ज्येष्ठ गिर्यारोहक सुरेंद्र शेळके यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. त्यांनी सप्टेंबरमध्ये सिक्कीम येथील इंडियन हिमालयीन सेंटर ऑफ ऍडव्हेंचर ऍन्ड इकोटुरिझम (आयएचसीएई) येथे गिर्यारोहणाचा अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com