स्टुडिओत ‘मित्रों’ची गर्जना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

क्‍लिपमध्ये गाण्यांचाही वापर 
क्‍लिपमध्ये संबंधित उमेदवाराने आजवर केलेली विकासकामे, त्यांची विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबतची छायाचित्रे, त्यांची आणि त्यांच्या नेत्यांची भाषणे, त्याला ‘जय हो’ किंवा ‘आशाएँ खिली दिल की’सारख्या गीतांची बॅकग्राउंड वापरली जात आहे, असे स्टुडिओचे संचालक ओंकार 
केळकर यांनी सांगितले.

इच्छुकांची लगबग सुरू; व्हॉट्‌सॲप, फेसबुकसाठी क्‍लीपवर भर

पुणे - तुतारी फुंकली जाते अन्‌ ‘मित्रों, मेरे प्यारे भाइयों और बहनों’ अशी गर्जना होते... त्यानंतर पुणेकरांसाठी अहोरात्र झटणारे, विकासाच्या कामात हिरिरीने भाग घेणारे आपले ‘भाऊ’ महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांना भरघोस मते द्या आणि बदल घडवा... असे आवाहन केले जाते. असा आवाज लवकरच तुमच्या कानावर पडणार आहे. तोही पुन्हा-पुन्हा. त्याची तयारी सध्या सुरू आहे, शहरातील वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये.
महापालिकेच्या निवडणुकीला जवळपास महिना उरला आहे; पण अद्याप युतीचा आणि आघाडीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे तिकीट वाटपही व्हायचे आहे. असे असले तरी ज्यांचे तिकीट पक्के झालेले आहे आणि ज्यांना तिकीट मिळणार, असा वरून ‘शब्द’ मिळालेला आहे, अशा सर्व इच्छुकांनी प्रचार साहित्य तयार करण्यावर भर दिला आहे. ‘व्हॉट्‌सॲप’, ‘ट्विटर’, ‘फेसबुक’साठी क्‍लीप तयार करण्याचा कल इच्छुकांमध्ये वाढत आहे. 
त्याची लगबग सध्या स्टुडिओमध्ये सुरू आहे.
 

‘शिवरंजनी स्टुडिओ’ मध्ये क्‍लिप तयार करून देण्याचे काम होत आहे. ‘पुण्याच्या हिताचे महत्त्वपूर्ण प्रकल्प सत्यात उतरविणारे आमचे तडफदार दादा’, ‘पुणे शहर स्मार्ट सिटी होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आपल्या ताई’, ‘पुण्यात मेट्रो सुरू व्हावी म्हणून पुढाकार घेणारे आपले लाडके भाऊ’... अशा घोषणा स्टुडिओत ऐकायला मिळत आहेत. 

या संदर्भात स्टुडिओचे संचालक ओंकार केळकर म्हणाले, ‘‘सोशल मीडिया’च्या माध्यमातून केलेला प्रचार अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे सर्वच पक्षांचे इच्छुक क्‍लिप तयार करण्यावर भर देत आहेत. ‘सोशल मीडिया’साठी एक मिनिटापासून ते पाच मिनिटांपर्यंतच्या क्‍लिप बनवल्या जात आहेत, तर प्रभागात फिरणाऱ्या रथावरील स्क्रीनसाठी पंधरा मिनिटांची क्‍लिप बनवत आहोत.’’

सध्या निवडणूक प्रचारासाठी इच्छुक उमेदवारांकडून ‘सैराट’, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘पोश्‍टर गर्ल’, ‘झेंडा’, ‘जय हो’ यांसारख्या चित्रपटांतील गाणी आणि संवाद वापरून तयार केलेल्या ‘क्‍लिप’ला मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज वापरून आणि त्यांच्या भाषणातील काही मुद्यांचा वापर करून क्‍लिप बनवा, अशीही मागणी होत आहे. या क्‍लिपसाठी सुमारे पाच हजार ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.  
- देवदत्त भिंगारकर, देवदत्त स्टुडिओ

व्हिडिओ-ऑडिओ क्‍लिपसाठी प्रभागातील विकासकामांच्या मुद्यांवर इच्छुकांकडून भर दिला जात आहे. ‘आम्ही हे करून दाखवले’, असे सांगितले जात आहे. याशिवाय मराठी सिनेअभिनेते-अभिनेत्री, मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांचा क्‍लिपमध्ये वापर होत आहे. त्यांचा आवाजही वापरला जात आहे. तरुणाईही मोठ्या प्रमाणात क्‍लिपमध्ये दिसेल. अशा क्‍लिपचा कालावधी एक ते दीड मिनिटांचा असतो.
- महेश लिमये, मल्हार प्रॉडक्‍शन

Web Title: clip creating for municipal election