मुंबई आटोक्‍यात येते, तर पुणे का नाही? मुख्यमंत्र्यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघडणी!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

मुंबईपेक्षा एक तृतीयांश पुण्याची लोकसंख्या आहे. दिवसरात्र काम करून मुंबई आटोक्‍यात येते, तर पुणे का येऊ शकत नाही.

पुणे : "दीड पावणे दोन कोटीचे मुंबई शहर आटोक्‍यात येऊ शकते, तर पुणे का नाही? अधिकारी बदलले, तरी आटोक्‍यात का येत नाही. मला वारंवार तेच तेच सांगायला लावू नका, जबाबदारीने काम करा,'' अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. तर "मुख्यमंत्र्यांना पुण्यात येऊन आढावा घ्यावा लागतो, यावरून तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात, हे लक्षात घ्या,'' अशी जाणीव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून दिली. 

जिल्हाअंतर्गत वाहतुकीच्या निर्णयाबाबत पुणे पोलिसांचे स्पष्टीकरण; वाचा काय म्हणतात पोलिस?

पुणे शहरातील कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी (ता.३०) अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्यासह जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, पोलिस आयुक्त, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

केंद्र आणि राज्य सरकार मदत करते आहे. कुठल्याही गोष्टींची कमी नाही, असेही सांगून ठाकरे म्हणाले, "मुंबईपेक्षा एक तृतीयांश पुण्याची लोकसंख्या आहे. दिवसरात्र काम करून मुंबई आटोक्‍यात येते, तर पुणे का येऊ शकत नाही. बाधित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधा. पुणे महापालिका, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्यात समन्वय ठेवा.''

तर पवार म्हणाले, "परत परत तेच सांगणार नाही. मुख्यमंत्र्यांना काय ती वस्तुस्थिती सांगा. त्यांना येथे यावे लागते, यावरून आपण कुठेतरी कमी पडतो, हे लक्षात घ्या.'' यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Thackeray and Deputy CM Pawar held a meeting of officials regarding coronavirus in Pune