सीएमई सबवे पूर्ण 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

पिंपरी - लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) सबवेचे काम पूर्ण झाले असून, त्यालगतच्या जोडरस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीच्या अखेरीला हा मुख्य रस्ता वाहतुकीला खुला होणार असून, त्या वेळी येथील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. 

पिंपरी - लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) सबवेचे काम पूर्ण झाले असून, त्यालगतच्या जोडरस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. जानेवारीच्या अखेरीला हा मुख्य रस्ता वाहतुकीला खुला होणार असून, त्या वेळी येथील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

शहरामध्ये हॅरिस पुलापासून प्रवेश केल्यानंतर वाहनचालकांना दहा लेनचा रस्ता उपलब्ध होतो. मात्र, थोड्या अंतराच्या प्रवासानंतर दापोडी येथे सीएमईमध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे वाहनचालकांना तेथे वाहतूक सिग्नलला थांबावे लागत असे. ती अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने गेल्या वर्षी जानेवारीत तेथे सबवे बांधण्याचा निर्णय घेतला. लष्करी वाहनांना तेथून जाता यावे, हे लक्षात घेऊन सबवेची उंची जादा ठेवण्यात आली. डिसेंबर 2017 मध्ये कामाला प्रारंभ झाला. 

त्याच काळात तेथे मेट्रोचेही काम सुरू करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना उर्वरित लेनमधून दापोडीतून प्रवास करावा लागत आहे. दुकानदारांनी केलेले अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला थांबलेली वाहने यामुळे सध्या तेथे रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. सबवेवरील जोडरस्त्याचे काम झाल्यानंतर वाहनचालकांना थेट मुख्य रस्त्यावरून मार्गस्थ होता येईल. 

हॅरिस पुलालगत बांधण्यात येत असलेल्या समांतर पुलाचे कामही वेगात सुरू आहे. येत्या दोन तीन महिन्यांत ते पूर्ण झाल्यास पुण्याकडून पिंपरीकडे येण्यासाठी दोन पूल उपलब्ध होतील. एकावेळी चार लेनमधून वाहतूक सुरू झाल्यानंतर वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल, तसेच वाहनांना त्यांच्या वेगानुसार पुढे मार्गस्थ होण्यासाठी लेनची निवड करता येईल. 

सीएमई येथील सबवेचे काम झाल्यानंतर त्यालगत बीआरटीसाठी स्वतंत्र लेन करण्यात येणार आहे. दापोडीपासून निगडीपर्यंत बीआरटी सुरू करण्यासाठी दापोडीतील या लेनचा उपयोग होईल. 

सबवेच्या पिंपरीकडील बाजूच्या जोडरस्त्यावर खडीकरण करण्यात आले. पुण्याकडील बाजूचे काम येत्या महिनाभरात पूर्ण केले जाईल. दोन्हीकडील जोडरस्त्याचे डांबरीकरण एकाचवेळी पूर्ण केले जाईल. 15 जानेवारीपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीला खुला करण्यात येईल. 
- बाळासाहेब शेटे, कनिष्ठ अभियंता, महापालिका 

आकडेवारी 
सबवेचा खर्च - 7.84 कोटी रुपये 
सबवेची जोडरस्त्यासह लांबी - 340 मीटर 
पिंपरी बाजूच्या जोडरस्त्याची लांबी - 123 मीटर 
पुणे बाजूच्या जोडरस्त्याची लांबी - 205 मीटर 
सबवेची रुंदी - 12 मीटर 
सबवेची उंची - 5.5 मीटर 

Web Title: CME Subway Complete