‘ग्रामीण’मधील सीएनजी पंपधारकांचा संप सुरुच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG Pump

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी गॅसपुरवठा करणाऱ्या पंपचालकांनी शुक्रवारपासून (ता. २७) सुरु केलेला बेमुदत संप दुसऱ्या दिवशीही (शनिवारी) चालूच आहे.

CNG Strike : ‘ग्रामीण’मधील सीएनजी पंपधारकांचा संप सुरुच

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी गॅसपुरवठा करणाऱ्या पंपचालकांनी शुक्रवारपासून (ता. २७) सुरु केलेला बेमुदत संप दुसऱ्या दिवशीही (शनिवारी) चालूच आहे. यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ग्राहकांना सीएनजी गॅस मिळणे दोन दिवसांपासून बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ४० सीएनजी पंप दोन दिवसांपासून बंद आहेत.

दरम्यान, या संपामध्ये पुणे शहरातील सीएनजी पंपचालक सहभागी नाहीत. त्यामुळे शहरातील सीएनजी गॅसचा पुरवठा चालू असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले. पुणे शहरातील पंपांद्वारे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीचा (एमएनजीएल) गॅस पुरवठा करण्यात येतो. एमएनजीएल कंपनीचा गॅस पुरवठा करणारे सर्वच सीएनजी पंप नियमितपणे चालून आहेत. मात्र गुजरातमधील टोरंट गॅस कंपनीच्यावतीने पुरवठा करण्यात येत असलेल्या सीएनजी गॅसचे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील४० पंप संपात सहभागी झाले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने २०२१ मध्येच सीएनजी गॅस पुरवठा करणाऱ्या पंपचालकांना सेवामूल्य (कमिशन) देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी एमएनजीएल या गॅस कंपनीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कंपनीच्या सीएनजी पंपचालकांना नियमानुसार सेवामूल्य (कमिशन) मिळत आहे. याउलट टोरंट गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आलेली नाही.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सेवामूल्य (कमिशन) मिळावे, अशी ग्रामीण भागातील सीएनजी पंपचालकांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी याआधीही संप पुकारला होता. परंतु त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानुसार त्यावेळी हा संप मागे घेण्यात आला होता.

पुणे शहरातील सर्व सीएनजी पंप सुरू आहेत. केवळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४० सीएनजी पंपचालक या संपात सहभागी झालेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व सीएनजी पंप हे मागील दोन दिवसांपासून बंद आहेत.

- अली दारूवाला, राष्ट्रीय प्रवक्ता, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

टॅग्स :puneStrikeCNG Pump