सीओईपीपर्यंत बीआरटी जुलैअखेर

ज्ञानेश्‍वर बिजले
मंगळवार, 22 मे 2018

पिंपरी - पुणे-मुंबई रस्त्यावर निगडी ते दापोडीदरम्यान जूनमध्ये बीआरटी बससेवा सुरू होत असून, त्याचवेळी या रस्त्यावरील रेंजहिल्स चौक ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यादरम्यान बीआरटी बसथांबे उभारण्यास पुणे महापालिकेने सुरवात केली आहे. जुलैपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात ये-जा करण्यासाठी सुमारे वीस किलोमीटर रस्त्यावर बीआरटी बससेवा उपलब्ध होईल.

पिंपरी - पुणे-मुंबई रस्त्यावर निगडी ते दापोडीदरम्यान जूनमध्ये बीआरटी बससेवा सुरू होत असून, त्याचवेळी या रस्त्यावरील रेंजहिल्स चौक ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) यादरम्यान बीआरटी बसथांबे उभारण्यास पुणे महापालिकेने सुरवात केली आहे. जुलैपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात ये-जा करण्यासाठी सुमारे वीस किलोमीटर रस्त्यावर बीआरटी बससेवा उपलब्ध होईल.

पुणे महापालिकेने सीओईपी ते हॅरिस पूल यादरम्यान ५.७ किलोमीटर रस्त्यावर बीआरटी लेनचे काम हाती घेतले आहे. रेंजहिल्स चौकात बसथांबा बांधण्यास त्यांनी सुरवात केली. या मार्गावर सात थांबे बांधण्यात येतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सोळा थांबे आहेत. मेट्रोचे काम आणि काही ठिकाणी अरुंद रस्ता यामुळे अडचण येणार असली, तरी मोठा स्वतंत्र मार्ग बीआरटीसाठी मिळणार असल्यामुळे सार्वजनिक बससेवा अधिक वेगवान होईल. 

संरक्षण विभागाकडून जागा मिळाली नसल्यामुळे रस्ता रुंदीकरण रखडले आहे. त्यातच बोपोडी व खडकी भागात रस्ता रुंदीकरणाबरोबरच मेट्रोचे कामही पुढील वर्षभर चालू राहील. हा तीन किलोमीटरचा भाग वगळल्यास उर्वरित मार्गावर बीआरटी सुरू होईल.

सीओईपी ते रेंजहिल्सदरम्यानचा रस्ता ४२ मीटर रुंदीचा असून, दुभाजकालगतची लेन बीआरटीसाठी, त्यालगतच्या सात मीटरमध्ये दोन लेन खासगी वाहनांसाठी ठेवण्यात येतील. त्यानंतर ४.५ मीटर जागा सेवारस्त्यासाठी, दोन मीटर जागा सायकल ट्रॅकसाठी, १.७ मीटर जागा पदपथासाठी आहे. 

सेवारस्त्यालगत वृक्षलागवड करण्यात येणार आहे. बीआरटी वगळता अन्य कामे पूर्ण झाली आहेत. खडकी कॅंटोन्मेंट व बोपोडीमधील रस्ता २१ मीटर रुंदीचा आहे, तर काही ठिकाणी १८ मीटर रुंदीचा आहे. संरक्षण विभागाकडून जागा मिळाल्यावर तो रस्ता ४२ मीटर रुंदीचा करण्यात येईल. संरक्षण विभागाकडून येत्या महिनाभरात परवानगी मिळण्याची शक्‍यता महामेट्रोच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पुणे महापालिकेतर्फे सीओईपी ते रेंजहिल्सदरम्यानच्या अडीच किलोमीटर रस्त्यावर चार बसथांबे आणि रस्ता दुभाजकालगतची बीआरटी लेन जुलैपर्यंत पूर्ण करण्यात येईल. खडकी व बोपोडीचे बसथांबे मेट्रो स्थानकाशी जोडून उभारले जातील. रस्ता रुंदीकरण आणि बीआरटीसाठीची निविदा १४९ कोटी रुपयांची आहे. 
- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका

मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी मिळाल्यानंतर जूनमध्ये निगडी ते दापोडी मार्गावरील बीआरटी सुरू केली जाईल. काळेवाडी ते देहू आळंदी रस्ता या साडेदहा किलोमीटर रस्त्यावरील बीआरटी जुलैमध्ये सुरू करण्याच्या उद्देशाने बसथांबे बांधण्याचे व स्वतंत्र लेन करण्याची कामे वेगाने सुरू आहेत.
- राजन पाटील, सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

नियोजित बसथांबे 
 शॉपर्स स्टॉप
 वाकडेवाडी
 शासकीय दूध डेअरी
 रेंजहिल्स चौक
 ऑल सेंट चर्च
 खडकी रेल्वे स्थानक
 बोपोडी 

Web Title: COEP BRT Bus Service