अतिथंडीमुळे पिके पडली काळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

सातगाव पठार - दोन दिवसांपासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अचानक वाढलेल्या थंडीने शेतातील चारा खाद्य मका व ज्वारी पिके पूर्णपणे गोठून खराब झाली असल्याने काळी पडली आहेत.

सातगाव पठार - दोन दिवसांपासून सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अचानक वाढलेल्या थंडीने शेतातील चारा खाद्य मका व ज्वारी पिके पूर्णपणे गोठून खराब झाली असल्याने काळी पडली आहेत.

या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांकडे पाळीव दुभती जनावरे आहेत. या जनावरांना खाद्य म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात हिरवा चारा म्हणून मका व ज्वारीचे पीक घेतले आहे. दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर थंडी, दवबिंदू, बर्फाचे कण पडल्याने यापूर्वी हिरवीगार व डौलदार असलेली मका व ज्वारी चारा खाद्य पिके पूर्ण खराब, काळी पडून थंड वातावरणात गोठून गेली आहेत. आता ही पिके वापरायोग्य नसल्याने येथील शेतकरी आपल्या पाळीव जनावरांना व दुभत्या जनावरांसाठी खाद्य कोठून देणार या भावनेने धास्तावला आहे. संबंधित विभागाने या नुकसानीचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकरी रवींद्र तोत्रे यांनी केली आहे.

चाऱ्याचा प्रश्‍न
पिके खराब झाल्याने दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा आता आणायचा कोठून असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे खराब झालेल्या मका व ज्वारी पिकांचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. 

जुन्नरमध्ये पंचनामा करण्याची मागणी 
आपटाळे - जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात अतिथंडीचा परिणाम होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने या नुकसानीची दखल घेऊन पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील आंबोली, भिवाडे बुद्रुक, शिवली, उच्छिल, वानेवाडी, धालेवाडी तर्फे मिन्हेर, कालदरे, काले, येणेरे, कुसूर आदी गावांमध्ये अतिथंडीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत पडलेल्या थंडीमुळे बर्फ तयार झाला. 
काही ठिकाणी पपईच्या बागा जळल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. आंब्याचा मोहोर काळा पडला आहे. पाने जळल्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जाते. 

तोडणीचा हंगामात असलेल्या बिजलीच्या फुलझाडांनाही यामुळे फटका बसला. कांद्याला करप्याचा प्रादुर्भाव होऊन उशिराने लागवड करण्यात आलेल्या कांद्याची फुगवण होणार नसल्याची चिंता शेतकरी व्यक्त करीत आहे.  दुष्काळाने पाणीटंचाईचा सामना करण्याऱ्या शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकविलेल्या पिकांची अतिथंडीमुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. 

गोठवणाऱ्या थंडीपासून पिकांना वाचवण्यासाठी रात्रीच्यावेळी पाणी देणे, वाळलेल्या पाला पाकळ्यांचे मल्चिंग करणे, लिक्विड सल्फरचे ड्रेनचिंग करणे, शेताच्या चारही बाजूने शेडनेट किंवा कापड बांधणे, पहाटे २ वाजता शेकोटी करावी, प्रतिएकरी ४ ठिकाणी धूर करणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, कृषी विज्ञान केंद्राचे भरत टेमकर व मंडळ अधिकारी भारत इसकांडे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold Agriculture Loss