पुण्यात पुन्हा परतणार थंडी

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 जानेवारी 2020

पुणेकर तीन दिवसांपूर्वी थंडीने रात्री गारठले होते. पण, त्यानंतर अवघ्या ७२ तासांमध्ये ही थंडी पळाली. राज्यात बुधवारी किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली असली, तरीही त्यापाठोपाठ पुणे आणि मालेगाव शहरांची नोंद झाली.​

पुणे - पुणेकर तीन दिवसांपूर्वी थंडीने रात्री गारठले होते. पण, त्यानंतर अवघ्या ७२ तासांमध्ये ही थंडी पळाली. राज्यात बुधवारी किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली असली, तरीही त्यापाठोपाठ पुणे आणि मालेगाव शहरांची नोंद झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात तीन दिवसांमध्ये रात्रीचे तापमान ५.७ अंश सेल्सिअसने वाढले. मात्र, पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमानाचा पारा पुन्हा ३.४ अंश सेल्सिअसने घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पुण्यात शिवाजीनगर येथील वेधशाळेत किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा हे तापमान ६.८ अंश सेल्सिअसने वाढले होते. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील सर्वाधिक वाढ सांगली येथे नोंदली गेली, तेथे ७.६ अंश सेल्सिअसने रात्रीचे तापमान वाढले होते. त्याखालोखाल पुणे आणि मालेगाव येथे किमान तापमानाचा पारा वाढला, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्यात शनिवारी ११.५ अंश सेल्सिअस नोंदलेला किमान तापमानाचा पारा बुधवारी सकाळी १७.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. पुढील दोन दिवसांमध्ये शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहणार आहे, त्यामुळे थंडी पुन्हा परतणार असल्याचेही हवामान खात्याने स्पष्ट केले. पुढील काही दिवसांमध्ये हवामान हळूहळू कमी होणार असून, मकर संक्रांतीपर्यंत थंडीचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला.

पुणे जिल्ह्यातील 1363 कोटींची विकासकामे पूर्ण : विश्वास देवकाते

विदर्भात काही ठिकाणी पाऊस  
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून असलेले पावसाचे सावट दूर झाले असून, दोन्हीही हवामान उपविभाग कोरडे राहणार आहेत. राज्यात येत्या शुक्रवारपासून (ता.१०) थंडी पुन्हा वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे बुधवारी सर्वांत कमी १२.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात आले. 

देशात मध्य प्रदेश आणि हरियाना परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने विदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये ढगाळ हवामान राहून तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा भागातही काहीअंशी ढगाळ हवामान राहील.

पुणे : अभाविपच्या फलकाला काळे फासणाऱ्या कार्यकर्त्याला...

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला या भागात बुधवारी हलका पाऊस झाला. अमरावतीतील नेरपिंगळाई, चांदूरबाजार परिसरात गारपिट झाल्याने शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत. वाशीम, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर या भागात काहीअंशी हवामान ढगाळ होते. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाच्या काही भागात ढगाळ हवामान आहे. यामुळे बहुतांशी भागात थंडी गायब झाली असून, किमान तापमानात वाढ झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold return in pune