Loksabha 2019 : चला, पुण्यात इतिहास घडवूयात..! 

Loksabha 2019 : चला, पुण्यात इतिहास घडवूयात..! 

‘विंटर इज कमिंग’पासून ‘विंटर इज हिअर’ अशी आठ वर्षांची स्थित्यंतर अनुभवलेल्या प्रत्येक नवमतदारासाठी आता हे वर्ष ‘विंटर’ सोबत ‘इलेक्‍शन इज हिअर’असेच आहे. २०१४च्या तुलनेत तीन लाखांनी वाढलेली युवा मतदारांची टक्केवारी यंदाच्या निवडणुकांचं वेगळेपण ठरतीये. त्यामुळे पुण्याच्या मतदानाचा टक्का वाढविण्याची जबाबदारीही याच नवमतदारांवर आहे. 

पुणेकरांनी ठरवले तर मतदानाचा टक्का ६२ टक्‍क्‍यांवर जाऊ शकतो, हा इतिहास आहे. मात्र, कधी राजकारणाविषयीची घृणा, उदासीनता, तर कधी मतदान प्रक्रियेतील दोषामुळे मतदानाचा टक्का घसरतो. आधुनिकतेचा कोणताही स्पर्श न झालेली राज्यातील अशी अनेक मतदान केंद्रे आहेत, जिथे मतदान यंत्रेही डोक्‍यावर घेऊन जावी लागतात. पण मतदान केल्याने आपल्या आयुष्यात बदल घडेल, या आशेने हे लोक मतदान करतात. मग शहरी भागात हे प्रमाण कमी का? पुणेकरांनी यंदा मतदानाला बाहेर पडून शहरी मतदारांवर होणारे आरोप खोडून काढावेत, अशी अपेक्षा आहे.

 निवडणूक आली की आपण मतदार यादीत नाव आहे काय, याची चाचपणी करतो. तसेच मतदानापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अपडेट करण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. गेल्या सहा महिन्यांत पुण्यात ५० हजार १३० मतदारांनी नव्याने नाव नोंदणी केली आहे. हा आकडा उत्साह वाढविणारा आहे. प्रश्‍न आहे तो प्रत्यक्ष मतदान करण्याचा. पुण्यातील ‘प्राब’ या संस्थेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. त्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील ७०७ मतदान केंद्रांवर ६२ टक्‍क्‍यांपेक्षा कमी मतदानाची नोंद झाली. पुणे मतदारसंघातील १९१ मतदान केंद्रांचा त्यात समावेश आहे. मतदार यादीतील दोष, नावांचा घोळ यामुळे पाच ते अठरा टक्के लोक मतदानापासून वंचित राहतात. पण मतदानाचा टक्का घसरविणारी इतर कारणे मात्र मतदारांच्या उदासिनतेकडे झुकणारीच आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक केंद्रांवर ७० ते ९० टक्‍क्‍यांच्या आसपास मतदान होते. लोकसभा निवडणूक ही तर देशाचे भविष्य घडविणारी असते. अशावेळी मतदानापासून दूर राहणे महागात पडणारे ठरेल!

 पुण्यात २०१४ च्या निवडणुकीत ५४.२४ टक्के मतदान झाले होते. यात सर्वांत जास्त मतदारसंख्या (४.४४ लाख) असणाऱ्या वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ४९ टक्के मतदान झाले होते. पुणे कॅंटोन्मेंट मध्ये हे प्रमाण ५१ टक्के होते. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. 

‘सकाळ’च्या वतीने मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी I Will Vote  ही मोहीम राबविण्यात आली. त्यात नवमतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या वेळी पुण्यात एक लाख मतदार पहिल्यांदा मतदान करणार आहेत. खरी जबाबदारी या युवा मतदारांची आहे. ते मतदानासाठी बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही सहभागी करून घेतले, तरी पुण्याची टक्केवारी झपाट्याने वाढेल. पुण्यात  १९८९ मध्ये ६२.६४ टक्के मतदान झाले होते. त्या वेळीही काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र त्यानंतर हा टक्का घसरत गेला. २००९मध्ये तो ४० टक्‍क्‍यांवर खाली आला. आताचे पुणे नवमतदारांचे आहे. आधुनिकतेची आस असणारे शहर कोणाच्या हाती द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी मतदान करणे आवश्‍यक आहे. मग पडताय ना बाहेर! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com