फसव्या सरकारविरुद्ध एकत्र या - अजित पवार

लोणी काळभोर (ता. हवेली) - विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांचा सत्कार करताना सरपंच वंदना काळभोर.
लोणी काळभोर (ता. हवेली) - विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात अजित पवार यांचा सत्कार करताना सरपंच वंदना काळभोर.

लोणी काळभोर - राज्याच्या सर्वांगीण विकासाऐवजी जनतेची फक्त दिशाभूल करण्याचे काम दोन्ही सरकारे प्रामाणिकपणे करीत आहे. आगामी निवडणुकीत या फसव्या केंद्र व राज्य सरकारला सत्तेवरून घालवण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. 

लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे सहा कोटी एकोणचाळीस लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी (ता. २९ ) झाले. या वेळी झालेल्या जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार जगन्नाथ शेवाळे होते. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकते, माजी अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक प्रकाश म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, उपाध्यक्ष नंदू काळभोर, तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, हवेली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवदास काळभोर, यशवंत साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, उपसभापती सचिन घुले, हवेली तालुका खरेदी- विक्री संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी जनतेला देशात अच्छे दिन आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अच्छे दिनच्या नावाखाली जनतेला मागील चार वर्षांच्या काळात महागाई, बेरोजगारी, शेतकरी मुळापासून उद्‌ध्वस्त, शेतकऱ्यांचा संप, व्यापाऱ्यांवर काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ, शेअर बाजारात ठणठण गोपाळ, न्याय क्षेत्राबरोबरच, सीबीआय या स्वायत्त संस्थांतही अस्वस्थता, देशात अराजकता निर्माण अशी फळे मिळाली आहेत. खोटे बोल पण रेटून बोल अशी चार वर्षांतील केंद्र व राज्य सरकारची कामगिरी राहिली आहे.’’

आरक्षणाचे गाजर दाखवत झुलवले...
शेतकऱ्यांची सध्याची अवस्था लक्षात घेऊन, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीने राज्य सरकारकडे संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली होती. मात्र, सरकारने कर्जमाफी केल्याच्या घोषणेला वर्षभराचा काळ उलटूनही, अद्याप एकाही शेतकऱ्याला कर्जमाफीचा पूर्ण लाभ मिळालेला नाही. एकीकडे भाजप-शिवसेना सरकार शेतकऱ्यांना वारंवार अडचणीत आणत असतानाच, मुस्लिम, मराठा, धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवत पाच वर्षे झुलवत ठेवले आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. 

शिरूर लोकसभा व विधानसभा मतदारसंघात पक्षाची मोठी ताकद असतानाही, केवळ अपापसांतील मतभेदामुळे येथून पक्षाला यश मिळू शकलेले नाही हे वास्तव सर्वांनीच लक्षात ठेवण्याची गरज आहे.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com