शेतकऱ्यांनो, पिकांच्या पंचनाम्यासाठी ही कागदपत्रे ठेवा तयार  

जयराम सुपेकर
Tuesday, 8 September 2020

बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील गावांत वादळी वारे व जोरदार मुसळधार पावसामुळे ऊस, बाजरी सारखी पिके भूईसपाट झाली. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

सुपे (पुणे) : बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील गावांत वादळी वारे व जोरदार मुसळधार पावसामुळे ऊस, बाजरी सारखी पिके भूईसपाट झाली. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या पिकांचे पंचनामे करण्याचे काम महसूल व कृषी विभागामार्फत चालू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकाची झेरॉक्सप्रत, अर्ज व नुकसानग्रस्त पिकाचा फोटो तयार ठेवावा. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी माहिती दिली की, सुपे व परिसरात रविवारी (ता. ६) रात्री दोन तासात ११३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली. सुपे व परिसरात कामगार तलाठी आर. एन. चौधरी, कृषी सहायक अमोल लोणकर यांनी पंचनामे सुरू केले आहेत. कोरोना साथीमुळे सुरक्षेचे नियम पाळून पंचनामे करण्यास अधिकचा वेळ लागत आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे नुकसान झाल्याची माहिती क्षेत्रीय स्तरावरून नजर अंदाजित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर या आकडेवारीत बदल होऊन नेमकी आकडेवारी मिळणार आहे. 

आता लग्नाची सीडीही पोलिस ठाण्यात द्यावी लागणार

तालुक्यात पीकनिहाय क्षेत्र हेक्टरमध्ये पुढीलप्रमाणे : ऊस- १६३२, बाजरी- १३६४, मका- ५५५, कांदा- १११, सोयाबीन- ८२, भाजीपाला- ९६. असे मिळून ३ हजार ८४० हेक्टर क्षेत्रातील सुमारे ८ हजार १६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आंबी खुर्द परिसरातही पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, पंचनामे करण्याची मागणी बाजार समितीचे माजी उपसभापती रघुनाथ कुतवळ यांनी केली आहे.

निसरड्या रस्त्यामुळे अपघात
कृषी सहायक लोणकर यांनी सांगितले की, कुतवळवस्ती परिसरात पंचनामे करण्यास दुचाकीवरून गेलो असता. निसरड्या रस्त्यामुळे दुचाकी घसरून इजा झाली. अशा स्थितीत त्या परिसरात पंचनामे केले. या वेळी राहुल बोडरे, गोरख कुतवळ, सोमनाथ कुतवळ, मोहन कुतवळ आदी शेतकरी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commencement of crop damage panchnama in Baramati taluka