सासवडला घरोघरी पाइपलाईनव्दारे गॅस पुरविणाऱ्या प्रकल्पाचा प्रारंभ

श्रीकृष्ण नेवसे
Monday, 26 October 2020

सासवड नगरपालिकेने क वर्ग नगरपालिकांत राज्यात सर्वप्रथम पाईपलाईद्वारे घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरविणारा प्रकल्प राबविण्याचे काम हाती घेतले आहे.

सासवड : देशात स्वच्छतेत लागोपाठच्या वर्षी चमकदार कामगिरी करुन कोट्यवधी रुपयांचे बक्षिस मिळविणाऱ्या सासवड नगरपालिकेने क वर्ग नगरपालिकांत राज्यात सर्वप्रथम पाईपलाईद्वारे घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पुरविणारा प्रकल्प राबविण्याचे काम हाती घेतले आहे. भविष्यात सासवड शहर पुण्याचे उपनगर म्हणून अधिक चांगली प्रगती करेल, असे प्रतिपादन पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सासवड (ता. पुरंदर) येथे शहरात महेश गॅस अर्थात टोर्रोन्ट गॅस कंपनीच्या वतीने व सासवड (ता. पुरंदर) नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने पाईपलाईनव्दारे घरपोच गॅस पुरविण्याच्या प्रकल्पाचे काल दसऱयाच्या मुहूर्तावर कामाचा शुभारंभ झाला. पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते व नगराध्यक्ष मार्तंड भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी टोर्रोन्ट गॅस कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट मिलींद नरहरशेटीवार, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्रीधर ताम्बरपर्णी, पालिका मुख्याधिकारी विनोद जळक, उपनगराध्यक्ष निर्मला जगताप व नगरसेवक, जिल्हा बँक संचालक प्रा. दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कंपनीच्या वतीने श्री.नरहरशेटीवार यांनी काम गतीने सुरु राहणार असल्याची माहिती दिली. 

जगताप म्हणाले, आदरणीय कै. चंदुकाका जगताप यांनी तीस कि.मी.वरुन वीर धरणाचे पाणी सासवडला आणले. तसेच स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन राज्यात चमकण्याची परंपरा घालून दिली. ती पुढेही सुरु असून ड्रेनेजचे काम प्रगती पथावर असून गॅस लाईनच्या कामानंतर शहरातील साऱया रस्त्यांचीही कामे केली जातील. तर सर्वश्री इंगळे, दुर्गाडे यांनीही मनोगते मांडली. नगराध्यक्ष भोंडे व मुख्याधिकारी जळक आणि टिमने कार्यक्रमाचे संयोजन केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कसा असेल पाईपलाईन गॅस प्रकल्प...सरकारने टोर्रोन्ट गॅस कंपनीला घरोघरी गॅस पोचविण्यास मान्यता दिल्याचे व्हाईस प्रेसिडेंट मिलींद नरहरशेटीवार यांनी सांगितले की, घरी येणाऱया सिलेंडरमधील गॅसपेक्षा हा गॅस हलका, कार्बनचे प्रमाण कमी असलेला, सुरक्षित व प्रदुषण कमी करणारा असेल.* सिलेंडरएवढ्या गॅससाठी किमान 150 रुपये कुटुंबियांची बचत होईल.* सासवड शहरात मुख्य गॅस पाईपलाईन 40 कि.मी.ची व वितरण नलीका 20 कि.मी. लांबीच्या राहतील.* पहील्या टप्प्याचे काम मार्च 2021 अखेर पूर्ण होणार.* किमान 10,000 घरे व व्यावसायिकांपर्यंत पाईपलाईनने एप्रिलअखेर गॅस पोचेल * 500 रुपये नोंदणी व 500 रुपये अनामत आणि 5,000 रुपये जोडणी फी राहील.* घरोघरी गॅस पुरवित असताना वाहनांसाठीही काही पंप टोर्रोन्ट गॅस कंपनी उभारणार.

 
(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commencement of project to supply gas to Saswad through pipeline from house to house