सरकारच्या समित्यांवर जाणे ठरतेय मूर्खपणाचे - रंगनाथ पठारे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑक्टोबर 2016

पुणे - ‘‘सरकारच्या समित्यांवर जाणे मूर्खपणाचेच ठरत आहे. समितीच्या माध्यमातून आपण काहीतरी गांभीर्याने ठरवत असतो; पण सरकार त्या दिशेने अजिबात पावले टाकत नाही. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसाठीही ते काहीच करत नाहीत. त्यामुळे एकत्र येणे, गप्पा मारणे आणि भत्ता उचलणे एवढ्यापुरत्याच समित्या उरल्या आहेत,’’ अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक आणि सरकारच्या अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांनी सरकारवर टीका केली.

एका कार्यक्रमानिमित्ताने पठारे मंगळवारी पुण्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारी समित्यांची सद्यःस्थिती मांडली. ते म्हणाले, ‘‘खरंतर यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर काही राज्यकर्ते अपवाद म्हणून वगळले तर इतर सर्व राज्यकर्त्यांमधील सांस्कृतिक आस्थाच आपल्याला कमी कमी होत गेलेली दिसते. यशवंतरावांनी जो पाया आपल्याला घालून दिला होता तो जपला असता, पुढे नेला असता तरी साहित्य-संस्कृतीसाठी खूप मोठी कामे झाली असती.’’

भाषा, साहित्य, संस्कृतीसंदर्भात आपल्याकडे वेगवेगळ्या समित्या आहेत. या समितीच्या बैठकांना सचिव येत नाहीत. ते आपल्या कारकुनाला पाठवतात. यावरूनच भाषा, साहित्य, संस्कृतीकडे सरकार, प्रशासन किती गांभीर्याने पाहते, हे आपल्याला कळते. महाराष्ट्र मोठा झाला आहे. सांस्कृतिक आस्था विस्तारली आहे. प्रत्येक गावात वाचक निर्माण झाला आहे. मात्र तिथपर्यंत सरकार पोचत नाही. त्यांची वाचनाची भूक भागविण्यासाठी साखळी निर्माण झाली पाहिजे. सरकारला अशा अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत, असे त्यांनी सांगितले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांनी एकत्र येऊन दबाव निर्माण करायला हवा, असेही ते म्हणाले. 

संमेलनात ‘सुजट’ ऐश्‍वर्याचे प्रदर्शन
‘‘असंख्य वाचकांची उपस्थिती आणि कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची उलाढाल या गोष्टी कौतुकास्पद आहेत; पण संमेलनात ‘सुजट’ ऐश्‍वर्याचे प्रदर्शनच अधिक पाहायला मिळत आहे. ही थट्टा आहे. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी चांगला साहित्यिक समोर येत नाही’’, असे रंगनाथ पठारे यांनी सांगितले. भालचंद्र नेमाडे हे संमेलनाध्यक्ष व्हावेत. ते झाल्यानंतर पुढे मी होईन; पण नेमाडे कधीच होकार देणार नाहीत आणि त्यांच्याबरोबरच मीही कधीच संमेलनाध्यक्ष होणार नाही, अशी कोटीही त्यांनी केली.

Web Title: comment on government committee by rangnath pathare