Loksabha 2019 : ‘लाख मोला’ची बॅंकांना सूचना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

कोणत्याही पक्षाच्या खात्यावर एक लाखापेक्षा जास्त रक्कम झाल्यास त्याचीही दखल घेण्यात येणार आहे.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या कोणत्याही व्यक्तीने एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम बॅंकेतून काढली किंवा बॅंक खात्यात भरल्यास त्याबाबतची माहिती निवडणूक आयोगाला देण्याची सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी सर्व बॅंकांना दिली. कोणत्याही पक्षाच्या खात्यावर एक लाखापेक्षा जास्त रक्कम झाल्यास त्याचीही दखल घेण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका व अग्रणी बॅंकांच्या अधिकाऱ्यांची बैठक डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी त्यांनी मार्गदर्शन केले. प्राप्तिकर विभागाचे पुणे आयुक्त रवी प्रकाश व कोल्हापूर आयुक्त अभिजित चौधरी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजयसिंह चव्हाण, कोल्हापूरचे विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे आदी उपस्थित होते.  ‘‘निवडणूक कालावधीत कोणत्याही व्यवहाराबाबत शंका आल्यास बॅंकांनी याबाबतची माहिती तातडीने प्राप्तिकर विभागाला द्यावी. तसेच, निवडणूक निर्णय अधिकारी यांना नियमित अहवाल सादर करावा. दहा लाखांपेक्षा अधिकच्या व्यवहारांची माहिती निवडणूक आणि प्राप्तिकर विभागाला द्यावी. मात्र, हे करत असताना सामान्य लोकांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी बॅंकांनी घ्यावी,’’ अशी सूचना म्हैसेकर यांनी केली. 

बॅंकांनी हे करावे...
  उमेदवार, त्याची पत्नी/ पती अथवा त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या कोणाकडून (शपथपत्रातील माहितीप्रमाणे) एक लाखापेक्षा अधिक रक्कम खात्यावर जमा केली अथवा काढल्यास त्याची माहिती तातडीने निवडणूक विभागाला द्यावी.
  निवडणूक कालावधीत बॅंकांनी त्यांच्याकडील व्यवहारांची नियमित माहिती खर्चविषयक विभागाला द्यावी.
  १० लाख किंवा त्याहून अधिक रक्कम बॅंकेतून काढण्यात आल्यास त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यावी.

Web Title: Commissioner Dr. Deepak Mhaisekar gave instructions to all the banks on Wednesday