इंदापुरात राष्ट्रवादीमध्ये विधानसभा तिकिटासाठी स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वालचंदनगर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी सोमवारी (ता. २७) निरवांगी (ता. इंदापूर) येथील दगडवाडी येथे नंदिकेश्‍वराच्या साक्षीने थेट विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वालचंदनगर - इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी सोमवारी (ता. २७) निरवांगी (ता. इंदापूर) येथील दगडवाडी येथे नंदिकेश्‍वराच्या साक्षीने थेट विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीला एक वर्ष अवधी आहे. मात्र, आतापासूनच तालुक्‍यातील वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. आमदार दत्तात्रेय भरणे यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग आला. त्यात सोमवारी जगदाळे यांनी थेट, ‘मला जिल्हा बॅंकेचे चेअरमन वैगरे व्हायंच नसून आमदारकी लढवायची आहे,’ असे सांगून विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. गेल्याच आठवड्यामध्ये नागपंचमीनिमित्त त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सराटीमध्ये बोलावून अप्रत्यक्ष शक्तिप्रदर्शन केले होते. 

भरणे, जगदाळे, दशरथ माने यांनी सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाआघाडी करून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला अपयश आले. मात्र, सन २०१४ मध्ये जगदाळे विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, त्यांना सन २०१९ च्या निवडणुकी वेळी संधी देण्याचे आश्‍वासन पक्षाने दिल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, अंथुर्णे येथील मेळाव्यामध्ये खासदार सुळे यांनी, ‘पवारसाहेबांचे तालुक्‍यात सर्वांत जास्त प्रेम मानेदादांवर आहे,’ असे सांगून माने कुटुंबाच्या पारड्यामध्ये वजन टाकले होते. जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनीही तालुक्‍यामध्ये दीड वर्षाच्या कालावधीमध्ये ५८ कोटी रुपयांचा भरघोस निधी आणला. ते विधानसभेसाठी इच्छुक आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी भरणे, जगदाळे व प्रवीण माने यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवाराची माळ पडणार, याची उत्सुकता आहे. 

इंदापूरची जागा नेमकी कोणाला?
राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षामध्ये आघाडी होण्याची दाट शक्‍यता आहे. दोन्ही पक्षाची आघाडी झाल्यास इंदापूर तालुक्‍याची जागा कोणत्या पक्षाकडे जाणार, हेही महत्त्वाचे आहे. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा राज्याच्या राजकारणामध्ये दबदबा आहे. त्यामुळे आघाडी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते जागा आणू शकतात. तसेच, आमदार भरणे हे विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरच्या जागेवर दावा करणार. त्यामुळे इंदापूरची जागा नेमकी कोणाला मिळणार, याची उत्सुकता असणार आहे.  

Web Title: Competition for NCP's Vidhan Sabha ticket in Indapur