पिंपरी-चिंचवड पाणीपुरवठ्याबाबत पंतप्रधानांकडेच गाऱ्हाणे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडणार 
पाण्याबरोबरच या भागातील कचऱ्याचा प्रश्‍नदेखील गंभीर बनला आहे. महापालिकेने मोठ्या सोसायट्यांना सांडपाणीप्रक्रिया प्रकल्प बसवण्याची सक्‍ती केली आहे. या सर्व प्रश्‍नांवर मार्ग काढण्यासाठी फेडरेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. याखेरीज आमदार आणि स्थानिक नगरसेवकांना याबाबतचे निवेदन देणार आहेत. 

पिंपरी - महापालिकेकडून शहरातील हाउसिंग सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा महापालिकेकडे दाद मागितली होती. मात्र त्यामधून अद्याप हा प्रश्‍न न सुटल्यामुळे त्यांनी पंतप्रधानांकडे दाद मागितली आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील सोसायट्यांना महापालिकेकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याने टॅंकर मागवावे लागतात. महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये गळतीचे प्रमाण सुमारे 40 टक्‍के आहे. त्यामुळे शहरातील सोसायट्यांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. आतापर्यंत महापालिका आयुक्‍तांना याविषयाबाबत चार वेळा निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाकडून त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सोसायट्यांना दररोज अपुरा पाणीपुरवठा होत आहे. शहरात होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. शहरातील वाकड, पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर, पिंपळे-निलख, रहाटणी या भागात हौसिंग सोसायट्यांची संख्या जास्त असून, त्याभागातील सोसायट्यांना पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. 

मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडणार 
पाण्याबरोबरच या भागातील कचऱ्याचा प्रश्‍नदेखील गंभीर बनला आहे. महापालिकेने मोठ्या सोसायट्यांना सांडपाणीप्रक्रिया प्रकल्प बसवण्याची सक्‍ती केली आहे. या सर्व प्रश्‍नांवर मार्ग काढण्यासाठी फेडरेशनचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. याखेरीज आमदार आणि स्थानिक नगरसेवकांना याबाबतचे निवेदन देणार आहेत. 

सोसायट्यांतील नागरिकांना पाणी आणि कचऱ्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार केली आहे. येत्या 15 दिवसांमध्ये हा प्रश्‍न न सुटल्यास फेडरेशनतर्फे उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. 
- सुदेश राजे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाउसिंग फेडरेशन 

Web Title: complains about supply of Pimpri-Chinchwad water to PM office