पालखी मार्गासाठी भूसंपादन वेळेत पूर्ण करा- उपमुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहू ते पंढरपूर मार्ग आणि आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. पालखी मार्गासाठी भूसंपादन वेळेत पूर्ण करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या कामासाठी जानेवारी अखेरपर्यंत निधी प्राप्त होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पुणे : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत देहू ते पंढरपूर मार्ग आणि आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे. पालखी मार्गासाठी भूसंपादन वेळेत पूर्ण करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या कामासाठी जानेवारी अखेरपर्यंत निधी प्राप्त होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सरकारी विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हयातील विविध विकास कामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेतला. पवार म्हणाले, जिल्ह्यातील प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ मार्ग विकासकामांबाबत बैठकीत चर्चा केली. यामध्ये देहू, आळंदी भूसंपादन, पंढरपूर येथील वाळवंट सुधारणा कार्यक्रम, पालखी मुक्काम व रिंगण विकास, पालखी तळ भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला.

Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासह जिल्ह्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. पुरंदर विमानतळाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून मार्ग काढण्यात येईल. चाकण शहराच्या विकासाच्या दृष्टीने राज्य सरकार आपल्या सोबत आहे. शहर विकासाचा आराखडा तातडीने सादर करावा. शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुणे : डीएसकेमध्ये गुंतवणुक करणाऱ्या ठेवीदाराचे पैसे न मिळाल्याने आत्महत्या

शिवनेरीच्या विकासासाठी निधीची तरतूद
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 19 फेब्रुवारीला होणाऱ्या जयंती कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत पवार यांनी आढावा घेतला. शिवनेरीचे सुशोभिकरण, हरितीकरण आणि शिवजंयतीच्या आयोजनाबाबत त्यांनी जिल्हाधिकारी राम यांना सूचना दिल्या. शिवनेरीच्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात येईल. शिवनेरी महोत्सवासाठी दरवर्षी 25 लाख रुपये देण्यात यावे. त्यात दरवर्षी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने 10 लाख रुपये, जिल्हा दूध संघ, जुन्नर नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आठवड्यातून एक दिवस पुणे जिल्ह्यासाठी
"नव्याच्या नऊ दिवसासारखे अशी ही बैठक नाही. पालकमंत्री म्हणून आठवड्याला किमान एक दिवस पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील विकासकामांसाठी देणार आहे. दिलेल्या सूचनांची अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी झाली का नाही, याची शहानिशा केली जाईल', असे पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना बजावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complete the land acquisition on the time for Palkhi Route says Ajit Pawar