दूध उद्योगावर पॅकेजिंग सामग्री टंचाईचे सावट

Milk
Milk

पुणे - पॉलिथिन फिल्म उत्पादकांनी १५ डिसेंबरपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील दूध उद्योगावर पॅकेजिंग सामग्रीच्या टंचाईचे सावट येण्याची शक्यता आहे.

प्लॅस्टिक बंदी कायद्यातील तरतुदींचा वापर करीत खासगी पॉलिथिन फिल्म उत्पादकांची युनिटस् सील करण्याची जोरदार कारवाई सध्या शासनाकडून सुरू आहे. यामुळे उत्पादकांनी शासनाच्या विरोधात बंदची हाक दिली आहे. राज्यातील २५० पैकी ३०-३५ युनिटमधून दुग्ध उद्योगाला प्लॅस्टिक सामग्री मिळते. पर्यावरण विभागाने जारी केलेल्या २३ मार्चच्या अधिसूचनेनुसार, ५० मायक्रॉनखालील प्लॅस्टिकचा वापर दूध पिशवीसाठी करण्यास बंदी केली.

दुसऱ्या बाजूला पॉलिथिन उत्पादकांवर आता पर्यावरण विभागाकडून कारवाई केल्याने पॅकेजिंग सामग्रीचा पुरवठा विस्कळित होत आहे.महाराष्ट्र व दमण प्रांतातील दूध आणि आॅईल फिल्म प्लॅस्टिक उत्पादकांनी या समस्येवर दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या बैठकीत चर्चा केली. बैठकीनंतर राज्याच्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाला प्लॅस्टिक उत्पादकांनी पत्र पाठवून डिसेंबरच्या पंधरवड्यानंतर पुरवठा बंद करण्याचे कळविले.

पॉलिथिनवर कारवाईच्या प्रयत्नात शासनाने राज्यातील दूध उद्योगाला अडचणीत आणले आहे. प्लॅस्टिकला पर्याय द्यायचे ठरल्यास ग्राहकांना प्रतिलिटर २० रुपये जादा मोजावे लागतील. पुनर्चक्रणासाठी रिकाम्या दूध पिशव्या डेअरीवर आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून जिवाणू बाधा आणि दुर्गंधी अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल. 
- दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई दूध उद्योग.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com