esakal | पुणे - बॅंकेच्या ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरीप्रकरणी संगणक अभियंते गजाआड
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

बॅंकेच्या ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरून त्याची इतरांना विक्री करीत कोट्यवधी रुपये मिळविण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात अटक केलेल्या ‘मास्टरमाईंड’ महिलेसह अन्य आरोपींना लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला होता.

पुणे - बॅंकेच्या ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरीप्रकरणी संगणक अभियंते गजाआड

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे

पुणे - बॅंकेच्या ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरून त्याची इतरांना विक्री करीत कोट्यवधी रुपये मिळविण्याच्या प्रयत्नातील आरोपींना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात अटक केलेल्या ‘मास्टरमाईंड’ महिलेसह अन्य आरोपींना लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी तसेच विनाश्रम, झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटीच आरोपी बॅंकांच्या ग्राहकांच्या गोपनीय डेटा चोरीकडे वळल्याची माहिती आता पुढे आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सायबर पोलिसांनी या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत १४ ते १५ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये काहीजण नामवंत कंपन्यांमध्ये संगणक अभियंते होते. रवींद्र माशाळकर, आत्माराम कदम व मुकेश मोरे यांच्यासह आणखी एक व्यक्ती नामांकित आयटी कंपनीमध्ये संगणक अभियंते म्हणून कार्यरत होते. प्रत्येकास मागील पाच ते दहा वर्षांचा अनुभवही होता. मात्र लॉकडाउनमध्ये त्यापैकी एक-दोन जणांच्या नोकऱ्या गेल्या. तर एकाला गावी स्थायिक होणे भाग पडले होते. त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पद्धतीने लॉकडाउनचा फटका बसला होता. त्याचबरोबर औरंगाबादमधील एका खासगी वृत्तवाहिनीचा संचालक राजेश शर्मा याला व्यवसायात नुकसान झाले होते. ते नुकसान भरून काढण्यासाठी व पैसे कमविण्यासाठी त्याच्याकडून वेगळा मार्ग शोधला जात होता. तर या सगळ्या प्रकरणाची ‘मास्टरमाईंड’ असलेली अनघा मोडक ही शेअर मार्केटसाठी शेअर ब्रोकर म्हणून काम करीत होती. तिच्या सल्ल्यावरून अनेकांनी तिने सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र, लॉकडाउनमध्ये शेअर मार्केटही पडझडीमुळे तिच्याकडेही देणेकऱ्यांनी तगादा लावलेला होता. त्यासाठी तिच्याकडूनही पैसे मिळविण्यासाठी वेगळा पर्याय शोधला जात होता. तर अन्य आरोपींना झटपट श्रीमंत होण्याचा हव्यास होता.

तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या 

लाखो रुपयांना विकणार होते डेटा
आरोपींकडून झटपट श्रीमंत होण्यासाठीचा मार्ग म्हणून बॅंकेच्या ग्राहकांचा गोपनीय डेटा चोरून, त्याची विक्री करून किंवा थेट ग्राहकांच्या खात्यातील पैसे अन्य खात्यात वर्ग करून पैसे कमाविण्याचा उद्देश होता, असे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी स्पष्ट केले. संगणक अभियंत्यांनी बॅंकेच्या ग्राहकांचा चोरलेला गोपनीय डेटा मोडकने तिच्याकडे मिळविला होता. हाच डेटा अन्य आरोपींना विकण्यात येणार होता. त्या डेटासाठी काहीजण लाखो रुपये मोडकला देणार होते.

...तर ‘पीपीई किट’ घालून ‘एमपीएससी’ परीक्षा

लॉकडाउनमध्ये अनघा मोडकला शेअर मार्केटमध्ये फटका बसला होता, त्याच पद्धतीने खासगी वृत्तवाहिनी चालकाचेही लॉकडाउनमध्ये आर्थिक नुकसान झाले होते. तर नोकरी करणाऱ्यांना लॉकडाउनचा फटका बसला होता. त्याचबरोबर आरोपींना कोणत्याही श्रमाशिवाय झटपट श्रीमंत व्हायचे होते. अशा अनेक कारणांमुळे आरोपींनी डेटा चोरीचा गंभीर गुन्हा केला आहे.
- भाग्यश्री नवटके, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा

Edited By - Prashant Patil

loading image
go to top