महापालिकेच्या शाळेमध्ये मराठीतून संगणक प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

 महापालिकेच्या अनसूयाबाई खिलारे शाळेत मराठी भाषेतून संगणक प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. 

पुणे - महापालिकेच्या अनसूयाबाई खिलारे शाळेत मराठी भाषेतून संगणक प्रशिक्षण देण्यास सुरवात झाली. 

या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे उपस्थित होत्या. या उपक्रमाचे आयोजन नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी केले. मेहेंदळे म्हणाल्या, ‘‘आपली मुले मराठी माध्यमात आहेत म्हणून कुठेच कमी पडायचे कारण नाही. मातृभाषेतून जलद गतीने संगणक वापर शिकतील. ज्ञानाचे भांडार त्यांच्यासमोर खुले होईल आणि ते स्वतःची प्रगती साधतील.’’ 

‘‘लीना मेहेंदळे व कौशल्यम न्यास यांच्यामुळे आपल्या शाळेतील मुलांना संधी मिळाली आहे. संगणकाच्या वापराद्वारे ही मुले लिहितील, चित्रं काढतील, कविता करतील ते सर्व ‘खिलारे शाळेचे फेसबुक पेज’ निर्माण करून त्यावर टाकले जाईल,’’ असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.  या वेळी महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या तबलावादन परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या कृष्णा राठोड याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शुभांगी नायक व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका ढगे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Computer training in Marathi at Municipal School