esakal | नियमावर ठेवले बोट; कशाला उगाचंच खोट!
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

नियमावर ठेवले बोट; कशाला उगाचंच खोट!

sakal_logo
By
सु. ल. खुटवड -सकाळ वृत्तसेवा

मा. पोलिस आयुक्त, सप्रेम नमस्कार !

विषय : नियमावर बोट ठेवून त्रास देणाऱ्या पोलिस हवालदाराची बदली करण्याबाबत.

साहेब, तडजोडीवर विश्‍वास ठेवून, सर्वसामान्य माणूस व सरकारी कर्मचारी यांना जोडणारा आम्ही दुवा आहोत. आमच्यासारख्यांमुळे अनेक सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुखाचे दिवस पाहिले आहेत. ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ या तत्त्वावर आमचा पहिल्यापासून विश्‍वास आहे. मात्र, तुमच्या एका हवालदाराने त्याला तडा दिला आहे.

साहेब, आज सकाळी एका चौकात आम्हाला एका हवालदाराने थांबवले. ‘सिग्नल तोडला असून, पावती फाडावी लागेल’ असे सुनावले. मात्र, हा प्रकार नेहमीचा असल्याने आम्ही बेफेकीर होतो. ‘मला ओळखलं नाही, मी अमक्या-तमक्या नगरसेवकाचा खास कार्यकर्ता आहे’, असे सांगून त्यांना घोळात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी जुमानले नाही. मग आम्ही एका आमदाराचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगितले; पण तरीही त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही.

साहेब, नगरसेवक व आमदाराची ओळख सांगूनही, सिग्नल तोडणाऱ्या माणसाला तसेच न सोडणे किती चुकीचे आहे. खरंतर याबद्दल तुम्ही संबंधित हवालदारावर कारवाई केली पाहिजे. अशाने नगरसेवक व आमदारांची समाजातील इज्जत कमी होत नाही का? याला कोण जबाबदार?

साहेब, हवालदारसाहेबांनी नियमांवर बोट ठेवल्याने आम्हीही पुण्यातील नियम त्यांना सांगितला. ‘समोर पोलिस नसेल तर सिग्नल तोडणे, हा आमचा हक्क आहे. मात्र, तुम्ही खांबाआड थांबल्याने मला दिसले नाही, हा काय माझा दोष आहे का?’ असा प्रतिप्रश्‍न आम्ही त्यांना विचारला. त्यावर त्यांनी पावतीपुस्तक बाहेर काढले. मग मात्र नाइलाजाने आम्ही खिशात हात घालून पन्नास रुपये काढून, त्यांच्या हातावर ठेवले. ‘साहेब, घ्या मिटवून’ असे डोळे मिटून मी त्यांना म्हटले. आतापर्यंत शंभर तडजोडींचा अनुभव असल्याने आम्ही निश्‍चिंत होतो. मात्र, ‘हेल्मेटही नसल्याने त्याचाही दंड भरायला लागेल.’ असं त्यांनी म्हटल्यावर आम्हाला हसूच फुटलं

पुण्यात कुठं हेल्मेटसक्ती असते का? आम्ही एकवेळ दंड भरू पण हेल्मेट वापरणार नाही, असा आमचा बाणा असल्याचे सांगितले. आम्ही मास्क घालत नाही तर हेल्मेट कशाला वापरू, असेही त्यांना सुनावले. असे म्हणून खिशात ठेवलेला मास्क आम्ही शोधू लागलो. ‘मास्क लावला नसल्याने त्याचाही दंड भरावा लागेल,’ असे त्यांनी सांगितले. हे ऐकून मात्र आम्ही गडबडलो, कारण गाडीला फॅन्सी नंबरप्लेट असल्याने त्याचाही दंड घेतील की काय अशी भीती वाटू लागली. आम्ही तातडीने शंभर रुपयांची नोट त्यांच्या हातावर ठेवली. मात्र, बाराशे रुपये दंड भरावा लागेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मग आम्ही ‘तडजोड शुल्क दोनशे केले.’ त्यालाही नकार मिळाल्याने आम्ही तो आकडा पाचशेपर्यंत वाढवला.

खरंतर आम्ही दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत पैसे अनेकदा पोलिसांना दिले आहेत, त्यांनीही ते आनंदाने स्वीकारले आहेत. शेजारच्या चौकातच काय पण पुण्यात कोठेही आम्ही शे-दोनशे रुपयांत प्रकरण मिटवले असते. तसा आम्हाला दांडगा अनुभव असल्याचे आम्ही त्यांना पटवून दिले; पण हवालदारसाहेब ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

साहेब, अशापद्धतीने आमच्यासारख्यांकडून दंड भरून, पावती देऊन त्या हवालदारसाहेबांना काय मिळणार आहे? तडजोडीत दोघांचा फायदा असतो, हे त्यांना कोणी शिकवलेले दिसत नाही.

ता. क : बाराशे रुपये दंड भरल्यापासून आम्ही चालतानाही हेल्मेट वापरत आहोत. वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच मास्कही वापरू लागलो आहे. मात्र, असे नियम पाळणं, हे आमच्या तत्त्वात बसत नसल्याने आम्ही संबंधित हवालदारसाहेबांचा निषेध करतो.

कळावे, मधुअण्णा पुणेकर

loading image
go to top