सवलत दिली; आता बस वाढवा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

पुणे - मला नागपूरला जायचे होते. पाच तारखेचे रिझर्व्हेशन केले. पण शिवशाही शयनयानाच्या तिकिटात सवलतीची बातमी वाचली आणि आधीचे तिकीट रद्द करून आता सवलतीच्या दरातील तिकीट पुन्हा काढले आहे. यामुळे पैसे वाचले आहेत. खूप चांगला असा हा निर्णय आहे. आता या बसची संख्या वाढविली पाहिजे, अशी भावना दीपाली काळे या महिला प्रवाशाने व्यक्त केली. 

राज्य परिवहन मंडळाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवशाहीच्या तिकीट दरात ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळाली, त्याचा पहिला लाभ काळे यांनी घेतला. त्याबद्दल त्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रमेश शेलोत, ज्ञानेश्‍वर रणवरे, स्थानकप्रमुख नीता बाबर यांच्यासह आगारातील कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.  

वर्धापनदिनी प्रवाशांना गुलाबपुष्प देण्यात आले. तसेच, शिवशाहीच्या गाड्या सजविण्यात आल्या होत्या. सरकारच्या निर्णयामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. नाशिकला निघालेल्या वंदना गायधनी म्हणाल्या, ‘‘आम्ही शिवनेरीनेच प्रवास करीत होतो; परंतु आता शिवशाही आली आहे. त्यामुळे तिकिटांचे दर कमी झाले आहेत. आता ज्येष्ठांना सवलत मिळत आहे, याचा आनंद आहे.’’

पूर्वी एसटी महामंडळाची साधी गाडी वा एशियाड बसने आम्ही प्रवास करत असू. त्या वेळी उन्हाचा त्रास आम्हाला होत असे. आता शिवशाहीमुळे आमचा प्रवास माफक दरात आणि आल्हाददायक झाला आहे.
- शैला शिंदे, प्रवासी

शिवशाहीच्या तिकीट दरात ज्येष्ठ नागरिकांना ४५ टक्के सवलत हा खूप स्वागतार्ह निर्णय आहे; पण एसटीच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सेवा चांगली द्यावी आणि खासगीकरणाला आळा घालावा.
- विजयकुमार माने, प्रवासी

Web Title: concession bus st anniversary