प्रतिजैविकांसाठी  डॉक्‍टरांना नियमावली

प्रतिजैविकांसाठी  डॉक्‍टरांना नियमावली

पुणे - अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल रुग्णावर नेमके कोणते प्रतिजैविक (अँटिबायोटिक्‍स) किती प्रमाणात वापरायचे, याचा कोणताच नियम आतापर्यंत नव्हता. प्रत्येक डॉक्‍टर अनुभवाच्या जोरावर अँटिबायोटिक्‍स आणि त्याचा डोस ठरवत असे. डॉक्‍टरांची ही प्रॅक्‍टिस आता इतिहासजमा होणार आहे. कोणत्या रुग्णाला कोणते अँटिबायोटिक्‍स द्यायचे याचे डॉक्‍टरांना नेमके मार्गदर्शन होईल, अशी अँटिबायोटिक्‍स गाइडलाइन्स तयार करण्यात आली आहे. 

पाश्‍चात्त्य देशांनी तयार केलेल्या अँटिबायोटिक्‍स नियमावलीच्या आधारे आत्तापर्यंत आपण अतिदक्षता विभागातील रुग्णांवर उपचार करत होतो. पाश्‍चात्त्य देशांमधील लोकांची जीवनशैली, त्यांची गुणसूत्रे, त्यांच्या खाण्याच्या सवयी आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत. पण, त्यानंतरही आपण गेली अनेक वर्षे त्यांची अँटिबायोटिक्‍स नियमावली वापरत होतो. अर्थात त्याला कारणही असं होतं की, आपल्याकडे आपली स्वतःची अँटिबायोटिक्‍स वापराची नियमावली तयार करण्यासाठी आवश्‍यक ‘डेटा’ नव्हता. गेल्या पाच ते दहा वर्षांपासून देशातील वेगवेगळ्या  भागात वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉक्‍टरांकडून ‘डेटा’ संकलित करण्यात आला. त्यातून देशातील पहिली ‘इंडियन क्रिटिकल केअर मेडिसीन सोसायटी’तर्फे (आयसीसीएमएस) देशातील पहिली ‘अँटिबायोटिक्‍स गाइडलाइन्स’ तयार करण्यात आल्या आहेत.

का केली ‘अँटिबायोटिक्‍स गाइडलाइन्स’?
रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करताना नेमके कोणते अँटिबायोटिक्‍स प्रभावी ठरेल, असा प्रश्‍न डॉक्‍टरांना पडतो. कारण यापूर्वी अँटिबायोटिक्‍सला २५ ते ४० टक्के प्रतिकार करणाऱ्या रोगजंतूंचे प्रमाण आता ६० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले आहे. त्यामुळे आपल्या हातातून एक-एक अँटिबायोटिक्‍स कमी होत आहेत. हातात राहिलेल्या अँटिबायोटिक्‍सचा प्रभावी वापरासाठी ही नियमावली करणे काळाची गरज होती. आपल्याकडे अँटिबायोटिक्‍सची निवड, त्याचा डोस, त्याचे ‘काँम्बिनेशन’ कसे असावे, याची माहिती नव्हती. त्यामुळे आता या गाइडलाइन्स तयार केल्या आहेत. 

‘‘या गाइडलाइन्स तयार करताना सरकारी रुग्णालयातील डॉक्‍टरांनाही यात सहभागी करून घेतले. ‘एम्स’ आणि ‘आयसीसीएमएस’ असा हा संयुक्त प्रकल्प होता. या गाइडलाइन्स तयार करून आम्ही थांबलेलो नाही, तर दर महिन्यात देशातील मोठ्या शहरांमधील डॉक्‍टरांना सांगितले जात आहे,’’
डॉ. कपिल झिरपे, माजी अध्यक्ष, आयसीसीएमएस

‘‘गाइडलाइन्सबाबत ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ची (आयसीएमआर) प्राथमिक चर्चा झाली आहे. या गाइडलाइन्स ‘आयसीएमआर’ला सादर केल्यानंतर त्यांच्या समितीकडून तपासणार आहोत. त्यानंतर देशातील सर्व रुग्णालयांमध्ये अंमलबजावणी करता येईल.’’
डॉ. सुबाल दीक्षित, अध्यक्ष, आयसीसीएमएस

अशा केल्या ‘गाइडलाइन्स’
तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सहभाग
सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञांची मदत
रुग्णांवर उपचार करताना डॉक्‍टरांना येणाऱ्या अनुभवाचा समावेश
देशातील रुग्णालयांतून मिळालेल्या माहितीचे विश्‍लेषण
‘आयसीसीएमएस’ बारा हजार सदस्यांना या पाठविण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com