‘व्हिजन’बाबत गोंधळ

उमेश शेळके
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

पुणे - शहर आणि प्रभागाबद्दल उमेदवारांचे ‘व्हिजन’ काय आहे, हे जाणून घेऊन मतदारांना मतदान करण्याचा निर्णय घेता यावा, यासाठी ‘व्हिजन डॉक्‍युमेंट’ तयार करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला खरा; परंतु या उद्देशावर पाणी पडण्याची चिन्हे आहेत. उमेदवाराचे व्हिजन कोणी तयार करायचे, यावर निवडणूक आयोगाच्या स्तरावरच गोंधळ असल्याने या निवडणुकीत तरी ‘व्हिजन’ जाणून न घेताच मतदान करण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे.

निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराचे तीस सेकंदाचे व्हिजन तयार करून ते निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्याचा, तसेच निवडणूक कार्यालयाच्या समोर लावण्याचे बंधन राज्य निवडणूक आयोगाने घातले होते. मात्र उमेदवारांची संख्या आणि मतदानासाठी असलेला कमी कालावधी, ही प्रशासनासमोरील अडचण राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्यासमोर प्रशासनाने मांडली. निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांपूर्वी सहारिया पुण्यात आले होते. त्यावर त्यांनी उमेदवारांचे व्हिजन सादर करण्याबाबत आयोगाची भूमिका शिथिल करण्यात येत असल्याचे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांनी शक्‍य असेल, तर निवडणूक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. त्यांच्या मदतीने हे व्हिजन तयार करावे, अशा सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्याकडून अशा स्वयंसेवी संस्थांचा शोध सुरू झाला आहे.

व्हिजन कोणी सादर करायचे?
हे व्हिजन उमेदवारांनी सादर करावे, की निवडणूक आयोगाने, याबाबत प्रशासन स्तरावर गोंधळ आहे. महापालिका प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर हे व्हिजन उमेदवारांनी सादर करावयाचे आहे, असे सांगण्यात आले, तर जिल्हा प्रशासनाकडे चौकशी केल्यानंतर हे िव्हजन निवडणूक आयोगाकडून तयार करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

दहा दिवसांत अशक्‍यच
महापालिका आणि जिल्हा परिषदेसाठीचे मतदान दहा दिवसांवर येऊन ठेपले आहे. पुणे महापालिकेच्या १६२ जागांसाठी तब्बल अकराशेहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या ७५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १५० जागांसाठी एक हजार ९०० हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने या सर्व उमेदवारांचे व्हिजन तयार करण्याचे ठरवले, तर दहा दिवसांत ते तयार करावे लागणार आहे. एवढ्या कमी कालावधीत हे व्हिजन तयार होऊ शकते का, असा सवाल अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे.

Web Title: Confusion about Vision