महापरीक्षा पोर्टलमुळे गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन
भरतीमधील गैरप्रकार टाळण्यासाठी महापरीक्षा पोर्टल रद्द करून सर्व भरती एमपीएससीद्वारे करावी, अशी राज्यातील सर्वच तरुणांची मागणी आहे. त्यानुसार सरकारने तातडीने निर्णय घ्यावा; अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. महापरीक्षा पोर्टलवरून भरतीपरीक्षा घेताना अनेक ठिकाणी डमी उमेदवार आढळले आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही. या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, अशी मागणी समितीने केली आहे.

पुणे - सरकारी पदांच्या भरतीसाठी वापरण्यात येणाऱ्या महापरीक्षा पोर्टलमुळे राज्यात अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती आहे. या पोर्टलद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीत गैरप्रकार होत आहेत. यामुळे हे पार्टल बंद करावे. सरकारी भरतीसाठी परीक्षा घेण्यास राज्य लोकसेवा आयोग असताना सरकार खासगी कंपन्यांकडून पोर्टल का चालवीत आहे, असे प्रश्‍न उपस्थित करून सर्व भरती परीक्षा या एमपीएससीद्वारे घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

सरकारी पदासाठी भरती परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या समन्वय समितीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. महापरीक्षा पोर्टलमुळे गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलले जाते. गैरप्रकार करून भरतीप्रक्रिया केली जाते, असा आरोप यात करण्यात आला आहे. 

देशातील निवडणुका या स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाकडून म्हणजे सरकारी यंत्रणेकडून घेतली जाते. मग सरकारी पदांच्या भरतीसाठी खासगी कंपन्यांद्वारे प्रक्रिया का केली जाते. अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीद्वारे केली जाते, त्याचपद्धतीने अन्य श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती या व्यवस्थेद्वारे का केली जात नाही. सरकार बदलले की भरती परीक्षा करणाऱ्या कंपन्या का बदलल्या जातात, असा सवाल समितीचे पद्माकर होळंबे उपस्थित केला आहे.

महापरीक्षेच्या वेळी सामूहिक कॉपीचे प्रकार होणे, अभ्यासक्रमानुसार परीक्षा न होणे, प्रश्‍नांची पुनरावृत्ती होणे, हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने न होणे, परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था चांगली नसणे, डमी उमेदवारांद्वारे परीक्षा देण्याचे प्रकार घडत असल्याचे समितीचे पद्माकर होळंबे यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion by Mahapariksha Job Portal Youth