Pune Rapido: पुण्यात रॅपीडोवरून संभ्रम; टॅक्सी कंपन्या अन् जिल्ह्याधिकाऱ्यांच्या भूमिकेनं गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rapido

Pune Rapido: पुण्यात रॅपीडोवरून संभ्रम; टॅक्सी कंपन्या अन् जिल्ह्याधिकाऱ्यांच्या भूमिकेनं गोंधळ

पुण्यात रॅपीडोवरून संभ्रम; टॅक्सी कंपन्या आणि जिल्ह्याधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे गोंधळ निर्माण झाला आहे. एकीकडे पुण्यात रॅपीडो ॲपचा वापर करू नये आणि परवानाधारक वाहनांचा वापर करून सुरक्षित प्रवास करावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने केले आहे. मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर रुल्स २०२० अनुसार रॅपीडोने दुचाकी व तिनचाकी टॅक्सीसाठी समुच्चयक अनुज्ञप्ती (ॲग्रीगेटर लायसन्स) मिळण्याकरिता केलेला अर्ज जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत नाकारण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्यात शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारची कोणतीही योजना अद्याप राबविलेली नाही व बाईक टॅक्सी प्रकारचा परवाना जारी केलेला नाही. त्याचबरोबर बाईक टॅक्सीबाबत भाडे आकारणी धोरण अस्तित्वात नाही. त्याचबरोबर कायदेशीर बाबीची पूर्तता होत नसल्यामुळे व कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे दुचाकी टॅक्सीकरिता आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे तीनचाकी टॅक्सीकरिता समुच्चयक लायसन्स देण्याचा त्यांचा अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी 21 डिसेंबर रोजीच्या बैठकीतील निर्णयान्वये नाकारलेला आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे रॅपिडोच्या प्रवक्त्याने सांगितले की, पुणे आरटीओकडून आम्हाला ऑर्डर मिळाली आहे आणि या अस्वीकार्य आदेशाला विरोध करण्यासाठी कायदेशीर पर्यायांसह सर्व पर्यायांवर आम्ही विचार करत आहोत. रोज प्रवास करणाऱ्या लाखो पुणेकरांना वाहतुकीची सुविधाजनक, सक्षम आणि किफायतशीर पद्धत उपलब्ध करवून देण्याच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 57 हजार रॅपिड कॅप्टन्स व त्यांच्या कुटुंबियांना उपजीविका प्रदान करण्याच्या आमच्या उद्दिष्टाला अनुसरून आम्ही पुढील कृती करणार आहोत.

हेही वाचा: Sakal Special Report : पुण्यात RTPCR, Rapid Antigen साठी खासगी लॅबमध्ये लूट

तर आमच्या विरोधात जबरदस्तीने जर काही कारवाई केली गेली तर ती पुणे आरटीओची अतिरेकी कार्यवाही ठरेल तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या संरक्षणात्मक आदेशात तो एक हस्तक्षेप ठरेल अशी भूमिका रॅपिडोच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

हेही वाचा: Rapido : ‘रॅपिडो’वरील कारवाई थांबवावी; ॲड. अमन विजय