नवदांपत्‍यावर अभिनंदनाचा वर्षाव

राजेंद्रकृष्ण कापसे 
बुधवार, 12 जून 2019

लग्नाचा खर्च वाचवून त्या पैशातून पत्नीला उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेणाऱ्या जोडप्यावर आज सकाळपासून अभिनंदनाचा वर्षाव झाला.

खडकवासला - लग्नाचा खर्च वाचवून त्या पैशातून पत्नीला उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेणाऱ्या जोडप्यावर आज सकाळपासून अभिनंदनाचा वर्षाव झाला. या जोडप्याच्या नोंदणी पद्धतीने केलेल्या विवाहाची बातमी वर मंगळवारी प्रसिद्ध झाली आणि त्याला जगभरातून हजारो वाचकांचा प्रतिसाद लाभला.

 अहिरे गावातील विशाल राजेंद्र चौधरी व खडकवासला येथील भाग्यश्री भरत मते यांनी सोमवारी (ता. १०) नोंदणी पद्धतीने विवाह केला. यासाठी दोघांच्या हाराचे १०० रुपये धरून अवघा ३१० रुपये खर्च आला. असा नोंदणी विवाह करून लग्नातील अनाठायी खर्च टाळावा आणि तो संसाराच्या प्रगतीसाठी, शिक्षणासाठी वापरावा, असा संदेश तरुण पिढीला या जोडप्याने दिला आहे.

संबंधित बातमी  - 
अवघ्या 310 रुपयांत उरकला विवाह; पत्नीला देणार उच्चशिक्षण

विशालने ‘ड्राफ्टसमन’चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तो मागील १२ वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहे. भाग्यश्रीने कला शाखेची पदवी घेतली असून, सध्या भारती विद्यापीठात ‘वास्तुविशारद’च्या पाचव्या वर्षात शिकत आहे.

महात्मा फुले यांच्यावरील पुस्तक वाचताना लग्नात पैसा वाया का घालवायचा? हा विचार विशालला पटला. त्यामुळे लग्न करताना त्याने भाग्यश्रीच्या घरातील सर्वांना आणि स्वतःच्या आई-वडिलांना हा निर्णय समजावून सांगितला. त्या वेळी दोन्ही घरांतून विरोधाला आणि नाराजीला सामोरे जावे लागले.  नोंदणी विवाह केल्यानंतर किमान आळंदीला जाऊन साध्या पद्धतीने विवाह करा, असा आग्रह होता. तोही या जोडप्याने मान्य केला नाही. नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचाच निर्णय शेवटपर्यंत कायम ठेवला आणि अखेर दोन्ही घरांतील सर्वांनी तो मान्य केला.

लग्नातील वाचलेल्या पैशातून भाग्यश्रीच्या पुढील शिक्षणासाठी खर्च करणार आहे. तिचा मास्टर ऑफ आर्किटेक्‍चर करण्याचा मानस आहे. 
- विशाल चौधरी 

जोरदार लग्न लावून देण्यासाठी कर्ज काढून खर्च केला जातो. प्रसंगी जमीन विकली जाते. मात्र, हा असा अनाठायी खर्च टाळा. हे पैसे वाचवून आपली प्रगती करा. 
- भाग्यश्री मते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congratulations new couple