Loksabha 2019 :  कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष बूथवरच

Loksabha 2019 :  कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष बूथवरच

पुणे -  मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्षांच्या महायुतीने, तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीने शहरात मतदार यादीनुसार बूथवर कमालीचे लक्ष केंद्रित केले आहे. बूथच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. अनुकूल भागातून जास्तीत जास्त मतदान करून घेण्याचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांनी तयार केला आहे. त्यामुळे आता बूथप्रमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मोठी जबाबदारी पडली आहे. शहरात १९४४ बूथ असून, एका बूथमध्ये किमान ८०० ते १४०० मतदार आहेत. 

भाजपला ‘शक्तिकेंद्रां’ची ताकद  
घरोघरी जाऊन प्रचार केल्यानंतर आता प्रत्यक्षात मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यासाठी भाजपने यंत्रणा कामाला लावली आहे. शहरातील ४१६ शक्तिकेंद्रांची ताकद यासाठी कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. आपला बूथ आणि भाग सोडू नका, मतदारांशी संपर्कात राहा, लॅपटॉप, प्रिंटरची व्यवस्था करून ठेवण्याचे आदेश पक्षाने कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजपने सोशल मीडियाबरोबरच घरोघरी जाऊन महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा प्रचार करण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. पन्नाप्रमुख, बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख अशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रचना केली आहे. पाच बूथसाठी एक शक्तिकेंद्र स्थापन केले आहे. सुमारे दोन हजार बूथवर कार्यकर्ते व एका बूथवर १५ जणांची समिती नियुक्त केली आहे. प्रत्येक १०० मतदारांची जबाबदारी एक कार्यकर्त्यावर सात महिन्यांपूर्वीच दिली आहे. शक्तिकेंद्रांच्या प्रचाराच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. आत्तापर्यंत केलेले काम मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी कार्यकर्त्यांचा कस लागणार आहे.

आमच्या शक्तिकेंद्राच्या अंतर्गत एरंडवणे, नवसह्याद्री सोसायटीतील पाच बूथ केंद्रांची जबाबदारी आहे. उमेदवारी अर्ज भरल्यापासून प्रचाराच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी दोन-तीन सोसायट्यांची एका कार्यकर्त्यावर जबाबदारी आहे.
- पुनीत जोशी, शक्तिकेंद्रप्रमुख

काँग्रेसचाही बूथप्रमुखांकडे मोर्चा 
प्रचाराच्या तोफा थंडावताच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने आपला मोर्चा पक्षाच्या बूथप्रमुखांकडे वळविला असून, पुढील दोन दिवस मतदारांपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची भिस्त बूथप्रमुखांना पार पाडावी लागणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे २१०५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १७६८ असे सुमारे साडेतीन हजार कार्यकर्ते मतदारांच्या घरोघरी पोचणार आहेत. तसेच, विधानसभा अध्यक्ष, महिला, युवक आणि अन्य सेलच्या पदाधिकाऱ्यांचा ताफाही बूथप्रमुखांच्या दिमतीला राहणार आहे. 

महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांना प्रचारासाठी जेमतेम २१ दिवसांचा अवधी मिळाला. मतदानाच्या दिवशी सर्वाधिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी बूथप्रमुख हा महत्त्वाचा घटक असल्याने त्यांना जोमाने कामाला लागण्याची तंबी दिल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी सांगितले. बूथप्रमुख आणि ब्लॉक अध्यक्षांना स्वतंत्र कार्यक्रम दिला आहे. दोन दिवसांत बूथप्रमुख घरोघरी पोचतील, असेही बागवे यांनी स्पष्ट केले.

सहाही विधानसभा मतदारसंघांत बूथवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक बूथसाठी १०-१५ जणांची समिती आहे. आता शेवटच्या टप्प्यात आघाडीचे ३५०० कार्यकर्ते प्रत्येक बूथमधून जास्त मतदान व्हावे, यासाठी सक्रिय झाले आहेत.
- सचिन आडेकर, समन्वयक, काँग्रेस बूथ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com