आघाडीचा घाट अन्‌ कार्यकर्त्यांत घट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जानेवारी 2017

पुणे - निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांचे मोहोळ असणाऱ्या काँग्रेस भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेने शांतता पसरली आहे. निवडणूक जवळ आली तरी काँग्रेस भवन शांत असल्याबद्दल पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे, तर उमेदवारांच्या पातळीवर पक्षाची तयारी सुरू असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुणे - निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांचे मोहोळ असणाऱ्या काँग्रेस भवनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेने शांतता पसरली आहे. निवडणूक जवळ आली तरी काँग्रेस भवन शांत असल्याबद्दल पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे, तर उमेदवारांच्या पातळीवर पक्षाची तयारी सुरू असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

महापालिका निवडणुकीच्या काळात काँग्रेस भवनात नेहमी कार्यकर्ते, इच्छुकांच्या उपस्थितीने वातावरण भारावलेले असते; मात्र काँग्रेस भवनाचा फेरफटका मारल्यानंतर सध्या उलट वातावरण दिसून आले. राज्य निवडणूक आयोगाने ११ जानेवारीला निवडणूक जाहीर करताच काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची गर्दी वाढली होती. त्यापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींच्या निमित्ताने काँग्रेस भवन अनेक वर्षांनंतर कार्यकर्त्यांनी गजबजले होते. फटाके, घोषणा, पंजाचे चिन्ह असलेले झेंडे असे निवडणुकीचे वातावरण येथे अनुभवता येत होते. चार-पाच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा प्रस्ताव काँग्रेसच्या नेत्यांनी दिला. नेत्यांनी हा घाट घातल्याने काँग्रेस भवनातील कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली आहे. रविवारपासून अपवादानेच कार्यकर्ते इकडे फिरकत असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते या सर्वांचे लक्ष आघाडीचे काय होते, याकडे लागले आहे. आघाडी झाली तर आपली जागा राहणार का, अशी भीती इच्छुकांच्या मनात आहे. पक्षाचा, त्यातील कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आघाडीला विरोध आहे; पण काही नगरसेवकांना आघाडी हवी असल्याने पक्ष आणि पक्षाचे नगरसेवक यांच्यात या निर्णयावर एकमत होत नसल्याचेही पुढे आले आहे. काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये प्रचार सुरूही केला आहे; पण काँग्रेसचे उमेदवार यात पिछाडीवर असल्याचेही निरीक्षण येथील कार्यकर्ते नोंदवितात. आघाडी झाली अथवा नाही तरी आमचे काम सुरू असल्याचे सांगितले. 

निर्णयाची प्रतीक्षा
निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेस भवनात असलेल्या शुकशुकाटाबद्दल येथील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांनी चिंता व्यक्त केली. यापूर्वी निवडणूक म्हटली, की काँग्रेस भवन गजबजलेले असायचे. आता आघाडीच्या निर्णयाची वाट बघत बसावे लागत असल्याची खंतही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Web Title: congress bhavan pune