भाजप नेत्याच्या दबावाखाली 'त्या' ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट; अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशीची काँग्रेसची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

कोरोनाच्या गडबडीत काही अधिकारी या प्रस्तावासाठीच प्रयत्नशील होते. हे अनेक अभिप्राय एकाच दिवसात दिल्यावरून स्पष्ट होते.

पुणे : भाजपच्या नेत्याच्या दबावाखाली आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलची निविदा ठेकेदार विकास पाटील यांच्या सावी कन्स्ट्रक्शनला मिळावी, यादृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आले आहेत. यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल हे देखील दोषी आहेत. त्यांची चौकशी करावी, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरविंद शिंदे यांनी सोमवारी (ता.१०) पत्रकार परिषदेत केला.

ना बेड्सची चिंता, ना रुग्णवाहिकेची; कोथरूडमधील सोसायट्यांनी उभारलं स्वत:चं क्वॉरंटाइन सेंटर!​

शिंदे म्हणाले, 'कल्व्हर्टच्या निविदेत पात्र ठेकेदाराला अपात्र ठरवलं, आणि अपात्र ठरलेल्या विकास पाटील यांच्या सावी कन्स्ट्रक्शनला पात्र ठरविण्यात आले. ही बाब उघड झाल्यानंतर निविदा रद्द करून त्याची चौकशी अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्याकडे देण्यात आली. या चौकशीमध्ये काय झाले याचा अहवाल न देताच आंबिल ओढ्यातील रिटेनिंग वॉलचे २० कोटी रुपयांचे कामही पाटील यांनाच देण्याचा घाट घातला आहे.

या ठेकेदाराला सरकारी कामाचा अनुभव नाही. ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून एस्टीमेट केले जात आहे. हा ठेकेदार वापरत असलेले तंत्रज्ञान कोथरूडच्या आमदारांप्रमाणेच बाहेरून इंम्पोर्ट केले आहे. भाजपच्या एका पदाधिकार्‍याच्या वाढदिवसानिमित्त कोथरूड भागात लागलेले फ्लेक्स याच ठेकेदाराने स्पॉन्सर केले असून यावर त्याचे फोटोही आहेत.'

असंघटित कामगारांना दहा हजार रुपये अनुदान द्या; कोणी केली ही मागणी?​

कोरोनाच्या गडबडीत काही अधिकारी या प्रस्तावासाठीच प्रयत्नशील होते. हे अनेक अभिप्राय एकाच दिवसात दिल्यावरून स्पष्ट होते. अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल यांच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतरही त्यांनी या ठेकेदाराला अनुकूल अशीच भूमिका घेतली आहे. तेच यामध्ये दोषी आहेत. शासनाने या निविदा प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी नगरविकास विभागाकडे करणार असून लाच लुचपत विभागाकडे ही तक्रार करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress corporator Arvind Shinde alleged to BJP leader about PMC Tender