ना बेड्सची चिंता, ना रुग्णवाहिकेची; कोथरूडमधील सोसायट्यांनी उभारलं स्वत:चं क्वॉरंटाइन सेंटर!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात वेळेवर बेड्स उपलब्ध होत नाहीत. कधी रुग्णवाहिका वेळेवर येत नाही. शिवाय खासगी रुग्णालयातील उपचारासाठी लाखोंचा खर्च वेगळाच...

पुणे : सध्या सोसायटीमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. सर्व अनलॉक झाल्यामुळे कधीही काहीही घडू शकतं. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांची काळजी घेत त्यांना सोसायटीमध्येच सुविधा मिळाव्यात, यासाठी विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. १४ दिवस रुग्णालयात किंवा बाहेरील विलगीकरण कक्षात राहणे अवघड असते. या सुविधांमुळे रुग्णांना घरातील जेवण आणि आवश्यक सुविधा मिळतील. शिवाय रुग्णाला मानसिकदृष्ट्या आधार मिळाल्याने तो लवकर आजारातून बरा होणार आहे... कोथरूडमधील डीपी रस्त्यावरील वृंदावन हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी 'सकाळ'शी बोलत होते.

डीजे आवाज वाढवणार? साऊंड सिस्टिम असोसिएशनने केली 'ही' मागणी​

कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात वेळेवर बेड्स उपलब्ध होत नाहीत. कधी रुग्णवाहिका वेळेवर येत नाही. शिवाय खासगी रुग्णालयातील उपचारासाठी लाखोंचा खर्च वेगळाच... शहरातील ही परिस्थिती पाहता वृंदावन गृहनिर्माण कॉम्प्लेक्सच्या सभासदांनी एकत्रित येऊन सोसायटीमध्ये सर्व सुविधायुक्त दहा बेड्सचे स्वतंत्र विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. तेही कोणत्याही सरकारी किंवा महापालिकेच्या मदतीशिवाय.

कोथरूड येथील डीपी रस्त्यावरील राजलक्ष्मी सभागृहासमोर १३ गृहनिर्माण सोसायट्यांची एकत्रित वृंदावन हाउसिंग कॉम्प्लेक्स आहे. या सोसायट्यांमधील ५१७ फ्लॅटधारकांनी सुमारे दीड हजार स्क्वेअर फूट जागेतील हॉलमध्ये १० बेड्सचे हे  विलगीकरण केंद्र आहे. त्यात महिलांसाठी स्वतंत्र कक्षात दोन बेड्स ठेवण्यात आले आहेत. या केंद्रात दहा बेड्स, गाद्या, स्वतंत्र बाथरूम, वॉशिंग मशिन, गरम पाण्यासाठी गिझर, शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर, कपडे, भांडी, सॅनिटायझर, साबण, टॉवेल उपलब्ध करून दिले आहेत.

पुणेकरांच्या आठवड्याची सुरुवात ट्रॅफिक जॅमने; संध्याकाळीही डोकेदुखी ठरण्याची शक्यता​

इतकेच नव्हे तर ऑक्सिजन सिलिंडर, पीपीई किट्सही खरेदी करून ठेवले आहेत. रुग्णांना उपचारासाठी डॉक्टर त्यांच्या इच्छेनुसार स्वतः निवडता येईल. महत्त्वाचे म्हणजे रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन नर्सेस आणि रुग्णांच्या मदतीसाठी सभासदांमधून २२ स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. 

सोसायट्यांमधील सर्व सभासदांनी मनापासून एकत्रित येऊन हा उपक्रम राबविला आहे. सध्याच्या परिस्थितीत त्याची गरज आहे. सभासदाने घरातील चांगल्या स्थितीमधील वस्तू विलिनीकरण कक्षासाठी आणून दिल्या आहेत. सोसायटीमध्ये आजपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. यापुढेही कोणी सभासद बाधित होऊ नये, हीच अपेक्षा असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोथरूड परिसरात सोसायट्यांनी एकत्रित येऊन राबवलेला हा पहिलाच उपक्रम आहे. हा उपक्रम शहरांमधील इतर सोसायट्यांसाठी आदर्शवत ठरणार आहे. 
- दिग्विजयसिंह राठोड, उपनिबंधक (पुणे शहर)

होस्टेलमधील साहित्य घरी न्यायचंय? मग एक मेल पाठवा अन् साहित्य घेऊन जा!​

न्यू अजंठा सोसायटीमध्ये विलगीकरण कक्ष : 
कोथरूड येथील न्यू अजंठा गृहनिर्माण सोसायटीमधील क्लब हाऊसमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येत आहे. या सोसायटीतील सभासदांनीही पुढाकार घेत आवश्यक बेड्स, वैद्यकीय सुविधा आणि इतर साहित्य जमविले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येत असल्याची माहिती सोसायटीचे प्रशासकीय अध्यक्ष आशुतोष परदेशी यांनी दिली. 

सोसायटीतील विलगीकरण कक्षात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासाठी उपनिबंधक दिग्विजयसिंह राठोड, प्रकाश कुलकर्णी, आशुतोष परदेशी, राजेश चौधरी यांच्यासह सभासदांनी विशेष योगदान दिले आहे, असे सोसायटीतील सभासद पराग आपटे, मयुरेश साठे आणि छाया बनकर यांनी सांगितले.

सोसायटीतील रहिवाशांसाठी विलगीकरण कक्षात उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू, किराणा माल, भाजीपाला, फळे घरपोच मिळत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात झाला आहे.
- छाया बनकर, सभासद, न्यू अजंठा गृहनिर्माण सोसायटी.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two societies in Kothrud have started a quarantine center in the society premises