आघाडीसाठी काँग्रेसची चाचपणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

पुणे - बदललेल्या प्रभागरचनेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. त्यासाठीचे सूत्रही निश्‍चित केले जात आहे. दरम्यान, नगरसेवक-कार्यकर्त्यांशी विस्तृत चर्चा करूनच आघाडीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे - बदललेल्या प्रभागरचनेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. त्यासाठीचे सूत्रही निश्‍चित केले जात आहे. दरम्यान, नगरसेवक-कार्यकर्त्यांशी विस्तृत चर्चा करूनच आघाडीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिका निवडणूक स्वबळावर लढवू, असा नारा शहर काँग्रेसतर्फे काही दिवसांपर्यंत दिला जात होता, परंतु प्रभागरचना आणि आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यावर चित्र बदलले आहे. त्यामुळे नगरसेवक-कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे शहर काँग्रेसने जाहीर केले आहे. आघाडी केली नाही तर, कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळेल आणि पक्षाचे प्रत्येक प्रभागात अस्तित्व राहील, असे पक्षातील एका गटाचे म्हणणे आहे; तर आघाडी केल्यावर कार्यकर्ते निवडून येतील आणि पक्षवाढीला चालना मिळेल. त्यामुळे पक्षाचे अस्तित्व ठळक राहण्यासाठी आघाडी आवश्‍यक आहे, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीबरोबर जागावाटप करण्यासाठीचे सूत्र काहींनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत मांडले आहे. त्यात विद्यमान नगरसेवकांच्या जागा दोन्ही पक्षांनी कायम ठेवायच्या. गेल्या निवडणुकीत जो पक्ष शहरातील प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्या जागा संबंधित पक्ष लढवेल. उर्वरित जागा दोन्ही पक्ष समप्रमाणात लढवेल, तसेच प्रत्येक प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील. या सूत्रांवर चर्चा व्हावी, अशीही मागणीही काँग्रेसवर्तुळात होत आहे. 

दरम्यान, काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच नकार दिलेला नाही. उलट काँग्रेसच स्वबळावर निवडणूक लढविण्यास उत्सुक होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसच्या आज दोन बैठका
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने गुरुवारी दोन बैठकांचे आयोजन केले आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सकाळी अकरा वाजता काँग्रेस भवनामध्ये घेणार आहेत, तर महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी दुपारी एक वाजता काँग्रेस भवनामध्येच नगरसेवकांची बैठक बोलविली आहे. या बैठकांमध्ये महापालिका निवडणुकीशी संबंधित मुद्द्यांवर  प्रामुख्याने चर्चा होणार असल्याचे समजते.

Web Title: congress evaluation for municipal election