Video : पुण्यातील काँग्रेस भवनात खळ्ळ खट्याक; थोपटे समर्थकांचे कृत्य

टीम ई-सकाळ
बुधवार, 1 जानेवारी 2020

काँग्रेस भवनातील हल्ला कोणी आणि का केला? याची कल्पना नाही. मी माझ्या कामात होतो, त्यामुळे घटनेची नेमकी माहिती घेत आहे. अशा घटनांना थारा नसेल. 
- संग्राम थोपटे, आमदार

पुणे : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी पुण्यातील काँग्रेस भवनात घुसून तोडफोड केली. हातात काठ्या, दगड घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या "केबिन'वर चाल करीत दगडफेक केली. त्यात काँग्रेस भवनाचे नुकसान झाले असून, हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या हल्ल्याने संतप्त झालेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थोपटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी पक्षाकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंत्रिमंडळ विस्तारात थोपटे यांना डावलल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांत होती. त्यावरून 50 ते 60 कार्यकर्ते घोषणाबाजी करीत, सायंकाळी साडेपाच वाजता भवनाच्या दिशेने आले. दगडफेक करीत त्यांनी भवनाच्या इमारतीत प्रवेश केला. तेव्हा पहिल्या मजल्यावरील जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या "केबिन'च्या काचा फोडल्या. केबिनमध्ये जाण्याचा प्रयत्न करताच तेथील कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद केला आहे. त्यानंतर थेट शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या केबिनमध्ये येऊन कार्यकर्त्यांनी तेथील टेबल, खुर्च्या, फोटो आणि अन्य साहित्यांची तोडफोड केली. त्याचवेळी काही कार्यकर्ते शेजारच्या इंटकाच्या पदाधिकाऱ्यांचीही केबिन फोडली. त्यानंतर थोपटे यांच्या समर्थनार्थ घोषणा देत, आवारात येऊन भवनाच्या इमारतीवर पुन्हा दगडफेक केली. या हल्ल्यातून मी कशीबशी बाहेर पडले, असे प्रत्यक्षदर्शी कीर्ती भोसले यांनी सांगितले. 
पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेऊन काही हल्लेखोरांना ताब्यात घेतले. त्यात काही कार्यकर्त्यांनी पळ काढला. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्तेही दाखल झाले. या घटनेत काँग्रेस भवनातील साहित्याचे मोठे नुकसान झाले. काँग्रेस नेते अभय छाजेड, अविनाश बागवे, अजित दरेकर, दत्ता बहिरट यांनी घटनेचा निषेध केला.

पुण्यातील भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघातून संग्राम थोपटे हे तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. मागील 2014 च्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातून थोपटे हे काँग्रेसचे एकमेव आमदार होते. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना संधी देण्याची थोपटे समर्थकांकडून मागणी होत होती. संग्राम यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे हे सात वेळा आमदार होते. 

काँग्रेस भवनावरील हल्ला भ्याड असून, ही काँग्रेसची संस्कृती नाही. याची कल्पना वरिष्ठ नेत्यांना दिली आहे. हल्ला करणाऱ्यांवर पक्षश्रेष्ठी कठोर कारवाई करतील. हल्लेखोरांना पोलिसांनी अजिबात पाठीशी घालू नये. तसे झाल्यास पक्ष त्याची दखल घेईल. 
- रमेश बागवे, शहराध्यक्ष काँग्रेस, पुणे शहर 

काँग्रेस भवनातील हल्ला कोणी आणि का केला? याची कल्पना नाही. मी माझ्या कामात होतो, त्यामुळे घटनेची नेमकी माहिती घेत आहे. अशा घटनांना थारा नसेल. 
- संग्राम थोपटे, आमदार

आणखी वाचा 

संग्राम थोटपे समर्थकांनी जाळला काँग्रेसचा ध्वज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress leader sangram thopte supporters broke congress office in pune