हर्षवर्धन पाटील नुसता "शो' करणारे : दत्तात्रेय भरणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

आपण साधी माणसं, कोणीतरी "शो' करणारे येतील, खिशातून कंगवा काढून लांबसडक केसातून फिरवतील, मोठ्या मोठ्या थापा मारतील, परंतु तुम्ही फसू नका. प्रामाणिकपणे काम करणारा व नुसता "शो' करणारे यातील फरक ओळखा, असे आवाहन इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी नागिरकांना करत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला.

कळस (पुणे) : आपण साधी माणसं, कोणीतरी "शो' करणारे येतील, खिशातून कंगवा काढून लांबसडक केसातून फिरवतील, मोठ्या मोठ्या थापा मारतील, परंतु तुम्ही फसू नका. प्रामाणिकपणे काम करणारा व नुसता "शो' करणारे यातील फरक ओळखा, असे आवाहन इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी नागिरकांना करत माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना टोला लगावला.

रुई (ता. इंदापूर) येथे एका कार्यक्रमात आमदार भरणे बोलत होते. भरणे म्हणाले, ""उजनीचे पाणी शेटफळगढे येथे खडकवासला कालव्यात सोडून ते सिंचनासाठी उपलब्ध करण्याचा पर्याय आहे. याशिवाय टाटा कंपनीला वीज देऊन मुळशीचे पाणी इंदापूरसाठी आणण्याचा एक पर्याय आहे. यापुढील काळात तालुक्‍यातील सिंचनाच्या प्रश्नासाठी लढाई केली जाईल. सोमवारपासून खडकवासलाचे आवर्तन इंदापूर तालुक्‍यासाठी सुरू होईल. प्रतापराव पाटील यांनी कालव्याच्या पाण्यासाठी न्यायालयात लढा उभारला असल्याने, यावेळी 18 टीएमसीपर्यंत पाणी वापर करणाऱ्या पुणे महानगरपालिकेने 11 टीएमसी पाण्याची मागणी केली. त्यांच्याकडून जास्तीचा वापर होत असलेले 7 टीएमसी पाणी बचत होऊन यातून उन्हाळ्यात शेतीसाठी दोन आवर्तने उपलब्ध होतील.''
 
ज्यांच्या कालावधीत उजनीच्या बोगद्याला परवानगी मिळाली, जनाई-शिरसाई योजना झाली, त्यांनी मात्र इंदापूर तालुक्‍यातील सिंचनाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडायचे काम सध्या ते करीत असल्याचा टोला भरणे यांनी पाटील यांचे नाव न घेता लगावला. त्याकाळी अजित दादा पवार पालकमंत्री असल्याने इंदापूर तालुक्‍यातील सिंचनाला पाणी मिळत होते. या महाशयांनी (हर्षवर्धन पाटील) कधी पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थिती लावली नाही, का साधा फोन करून पाणी सोडण्याची विनंती केली नाही. यामुळे अशा "शो' करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला भरणे यांनी दिला.

पुणे शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन, तत्कालीन लोकप्रतिनिधींनी इंदापूर तालुक्‍यातील खडकवासला कालव्याच्या पाण्याबाबत योग्य निर्णय घेणे अपेक्षित होते. तसे न करता उजनीचे पाणी सोलापूर व मराठवाड्याला बोगद्याद्वारे देऊन तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला.
दत्तात्रय भरणे, आमदार, इंदापूर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress-NCP Politics In Indapur