काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी आणि 'मैत्रिपूर्ण लढत'ही! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविली आहे. मात्र, सत्ता स्थापनेसाठी निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याचा पुण्याचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे या वर्षी प्रथमच या दोन्ही काँग्रेसने निवडणूक पूर्व आघाडी केली आहे.

पुणे : भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी पुणे महापालिकेची निवडणूक एकत्र लढविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) अखेर आघाडी केली. मात्र, काही जागांवर अखेरपर्यंत एकमत न झाल्याने तेथे मैत्रिपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारण्यात आला. पुण्यात प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक पूर्व आघाडी झाली. 

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत प्रदेश पातळीवरही झालेल्या चर्चेतून मार्ग निघाला नसल्याने दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शहराध्यक्ष वंदना चव्हाण, काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम यांची संयुक्त बैठक हॉटेल वेस्ट इन येथे झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सुमारे सात जागांवर दोन्ही काँग्रेसमध्ये मैत्रिपूर्ण लढती होणार असून, उर्वरित जागांवर आघाडीतर्फे उमेदवार दिला जाणार आहे. आघाडीच्या जागा वाटपाच्या प्रस्तावाला मान्यता घेण्यासाठी डॉ. कदम आणि बागवे हे हेलिकॉप्टरने मुंबई येथील प्रदेश कार्यालयात गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महापालिकेची निवडणूक एकत्रित लढविण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. सुरवातीला काँग्रेसने 72 जागांचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. तो फेटाळून अवघ्या 46 जागा देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसेच्या शहरातील नेत्यांनी दाखविली होती. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक बैठकीत आघाडीतील आकडे बदलत गेले. पण, अखेर 18 प्रभागांवर गेल्या दोन दिवसांपासून एकमत होत नव्हते. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे संकेत दोन्ही काँग्रेस नेत्यांनी दिले होते. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविली आहे. मात्र, सत्ता स्थापनेसाठी निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याचा पुण्याचा राजकीय इतिहास आहे. त्यामुळे या वर्षी प्रथमच या दोन्ही काँग्रेसने निवडणूक पूर्व आघाडी केली आहे.

Web Title: Congress NCP Pune Municipal Corporation Dnyanesh Sawant Pune Election