Harshwardhan Sapkal : महाराष्ट्रधर्म वाचविण्याची काँग्रेसची जबाबदारी

महाराष्ट्रात सर्व जण गुण्यागोविंदाने राहत होते. पण आता जाती-धर्मात वाद सुरू झाले आहेत.
Harshwardhan Sapkal
Harshwardhan Sapkalsakal
Updated on

पुणे - महाराष्ट्रात सर्व जण गुण्यागोविंदाने राहत होते. पण आता जाती-धर्मात वाद सुरू झाले आहेत. निवडणुका येतील जातील, सत्ता येईल जाईल; पण सामाजिक सलोखा जपला गेला पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडली. त्यांनी आज पुणे ‘सकाळ’च्या कार्यालयास भेट देऊन संवाद साधला.

महाराष्ट्रधर्म वाचविण्याची काँग्रेसची जबाबदारी आहे. काँग्रेसने कायम सर्वसमावेशक भूमिका घेऊन सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. सत्ता येण्याची वाट पाहत बसण्यात अर्थ नाही, त्यापेक्षा महाराष्ट्रधर्म वाचविणे महत्त्वाचे आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारकडे तुम्ही कसे पाहता?

- राज्यात महायुतीला २३९ विक्रमी बहुमत मिळूनही सरकारबद्दल लोकप्रियता दिसून येत नाही. जेव्हा राज्यातील शेतमालाला नीचांकी भाव होता, त्याच काळात हे उच्चांकी बहुमत असलेले सरकार राज्यात स्थापन झाले. शेतकऱ्यांमध्येही रोष आहे, सरकारने कर्जमाफीचे आश्‍वासन दिले, पण त्याची घोषणा करत नाही. त्यामुळे बँकांकडून पीककर्ज घेण्याचे प्रमाण कमी होत आहे.

याचा दुसरा अर्थ खासगी सावकारांकडून कर्ज घेतले जात आहे, हा मोठा धोका आहे. बेरोजगारीचा प्रश्‍न गंभीर आहे. राज्यात पोलिसांच्या विश्‍वासार्हतेवरच प्रश्‍न निर्माण झाला आहे. बीडमध्ये तर पोलिसांऐवजी गुंडांनीच तेथील व्यवस्था ताब्यात घेतली आहे. औरंगजेबाची कबर काढून टाकणे, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आदींच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सामाजिक वातावरण बिघडलेले आहे. सरकार आणि पोलिस हे त्यांचे काम करत नसल्याने हे सर्व काही घडत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय वाटते?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा अशी दोन महत्त्वाची खाती आहेत. पण या दोन्ही खात्यांमध्ये नियंत्रण नाही. वीज बिलात वाढ होणार नाही, अशी घोषणा केली जाते आणि अचानक बिलात वाढ होते. स्मार्ट मीटरमुळे तर ३० ते ४० टक्के बिल वाढून येत असल्याने हा मोठा गैरव्यवहार आहे. अन्य मंत्र्याकडे हे खाते असते तर वेगळी बाब असती; पण मुख्यमंत्र्यांकडे ही खाती असूनही गडबड होत आहेत.

राज्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री असला पाहिजे ही आमची मागणी आहे. ती पूर्ण होत नसल्यानेच राज्यात कोयता गँग, आका, खोक्या हे असले प्रकार वाढत आहेत. फडणवीस हे नरेंद्र मोदी यांचे चॉकलेट बॉय असल्याचे सांगितले जाते. त्यांचे लक्ष धारावी झोपडपट्टी पुनर्विकास, नवी मुंबई विमानतळाचे काम अदानीला देणे, शक्तिपीठ महामार्ग करणे याकडे आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना ‘मॅनेज’ करतानाच फडणवीसांची दमछाक होत आहे.

शक्तिपीठ महामार्गाला विरोध का?

- उत्खननासाठी जगभरात ज्या कंपनीला बंदी घातली आहे, अशा कंपनीच्या सोईसाठी शक्तिपीठ महामार्गाचा रेडकार्पेट टाकला जात आहे. मध्य भारतातून गोव्यापर्यंत हा महामार्ग करताना गोव्यात कोणते शक्तिपीठ आहे? ऑस्ट्रेलियात अदानीला उत्खनन करण्यात बंदी घातली, युरोपातही बंदी आली आहे. तेथील यंत्रणा इथे वापरण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग केला जात आहे.

दवाखाना, पाणी या नागरिकांच्या गरजा असताना आणि कोणाचीही मागणी नसताना हा महामार्ग लादला जात आहे. राज्य सरकारकडे एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत आणि मग हा ८८ हजार कोटींचा महामार्ग का केला जात आहे. याचा अभ्यास करण्यासाठी आमची सत्यशोधन समिती गडचिरोलीत जाणार आहे.

काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत कसे करणार?

- सत्ता, संघटन आणि विचारधारा या तीन गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. संघटना मजबूत करण्यासाठी ब्लॉक अध्यक्ष नियुक्त केले जातीलच; पण गाव तेथे शाखाही सुरू केल्या जाणार आहेत. संघटन मजबूत झाले की वैचारिक लढाई करण्यासाठी मोठी ताकद उभी राहते. काँग्रेसमध्ये वजनदार नेते आहेत, ही काँग्रेसची बलस्थान आहे. पक्षापुढे संकट असताना याच काळात संघटना बळकट करण्याची संधी आहे.

काँग्रेसने नेहमीच सामूहिक नेतृत्वाला महत्त्व दिले आहे. सर्वांशी चर्चा करून, मतभिन्नता असली तरीही ती जाणून घेऊन आम्ही पुढे जातो. भाजपमध्ये काही ठरावीक नेते निर्णय घेतात. अशी स्थिती काँग्रेसमध्ये नाही. पण काँग्रेसमध्ये होणाऱ्या चर्चांची माहिती नकारात्मकपणे बाहेर येते, त्यातून गटबाजी वाढली, असे दाखवले जाते. पुण्यातही सामूहिक नेतृत्व होते. आता सतेज पाटील यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

काँग्रेसचा दुरावलेला मतदार जवळ का येत नाही?

- काँग्रेसने तंत्रज्ञान आणले, त्यामुळे मध्यमवर्ग वाढला; पण तो आमच्यापासून दुरावला गेला आहे. त्याला पुन्हा आणण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. यासाठी आम्ही जी कामे केली, सत्तेत असताना केलेले कायदे, त्यांचे फायदे नागरिकांना सांगावे लागणार आहेत. पक्षाचे केडरबेस संघटन तयार करण्यावर आम्ही भर देणार आहोत.

महाराष्ट्रात काँग्रेस स्वतंत्र का लढत नाही?

- महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही राजकीय अपरिहार्यता आहे. देशातील अनेक राज्यांत काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढत आहे. पण महाराष्ट्र, तमिळनाडू यासह अन्य काही राज्यांत आघाडी केलेली आहे. पण संपूर्ण देशाचा विचार केला तर त्यात केवळ दोनच प्रमुख पक्ष आहेत. एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरा भाजप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com