शरद पवारांच्या हत्येचा कट? पोलिसांत तक्रार, 'सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान'

टीम ई-सकाळ
Saturday, 8 February 2020

भाऊ तोरसेकर व "पोस्टमन' या वेबपोर्टलवर प्रतिक्रिया देणाऱ्यांविरुद्ध ही तक्रार देण्यात आली आहे.

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा रचण्याबरोबरच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान रचले जात असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी ही तक्रार दिली आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेऊन तपास केला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाऊ तोरसेकर व "पोस्टमन' या वेबपोर्टलवर प्रतिक्रिया देणाऱ्यांविरुद्ध ही तक्रार देण्यात आली आहे. खाबिया यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियामध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्‍याला तडा जाईल, अशा पद्धतीची टीका केली जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीचे राजकारण थांबण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर भाऊ तोरसेकर, घनशाम पाटील व इतर लोक सातत्याने युटयूबवर (पोस्टमन, थिंकटॅंक) या चॅनेलवर व्हिडीओ अपलोड करीत आहेत. त्यावरील भाषणांद्वारे तरुणांमध्ये आणि समाजात शरद पवार यांना संपविले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केली जात असल्याचे निदर्शनास आले.

आणखी वाचा - वारकरी परिषदेच्या वादग्रस्त पत्रााला शरद पवारांचं उत्तर

आणखी वाचा - पुण्यातील चुकलेल्या उड्डाण पुलांचं करायचं काय?

कोरेगाव-भीमा दंगलीचे सूत्रधार कोण?  यावर अजून प्रश्नचिन्ह असताना ही वक्तव्ये ज्या भाषणातून येतात त्या केवळ प्रतिक्रिया नसून मोठ्या नेत्यांच्या हत्येचा कट आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्याचा त्वरीत व सखोल तपास करावा. या कारस्थानाच्या सूत्रधारांवर कठोर कलमांद्वारे गुन्हे दाखल व्हावेत. याप्रकरणाची गुंतागुंत मोठी असल्याने व सदर लोकांना राजकीय पाठिंबा असल्याने कायद्यातून कसे सुटावे याचे पुरेपूर ज्ञान त्यांना असल्याचा ही संशय आहे. संबंधित सर्व व्हिडिओ पाहून ते करणारे व त्यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीद्वारे केली आहे.

लक्ष्मीकांत खाबिया यांनी आज दुपारीच आमच्या पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित व्हिडीओबाबत सायबर पोलिसांकडून युट्यूबला मेल पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे.
- बाळासाहेब कोपनर, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: conspiracy to kill ncp leader sharad pawar police complaint shivaji nagar