पावसाच्या रीपरीपीने बांधकाम साईट संथ; बांधकाम मजुरांचे हाल

रमेश मोरे
बुधवार, 11 जुलै 2018

पावसामुळे बांधकाम कामे संथ गतीने सुरू असल्याने बांधकाम साईटवर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील मजुर कामगारांचे हाल होत आहेत.

जुनी सांगवी - गेल्या आठवडाभरापासुन पडणाऱ्या पावसामुळे बांधकाम कामे संथ गतीने सुरू असल्याने बांधकाम साईटवर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या बांधकाम क्षेत्रातील मजुर कामगारांचे हाल होत आहेत. हाताला काम नसल्याने काम मिळविण्यासाठी मजुर अड्ड्यांवर बांधकाम क्षेत्राशी सबंधित मजुर कामगारांची गर्दी पाहायला मिळत आहे.

एरव्ही बांधकाम व्यावसायीक ठेकेदारांना मजुरांची शोधाशोध करून मजुर मिळत नसल्याचे चित्र असायचे मात्र गेली आठवडा भर पडणाऱ्या पावसाच्या रिपरिपीमुळे सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील बांधकाम व संबंधित कामे ठप्प झाली आहेत. मराठवाडा, कर्नाटक भागातून अनेक कुटुंब पिंपरी चिंचवड शहरात बांधकामाशी निगडीत मजुरी काम करतात. पावसाची रिपरिप व देखभाल दुरूस्तीची कामे थंडावल्याने मजुरांना कोणी काम देता काम अशी विनवणी करावी लागत आहे.

मजुर अड्डयावर गेली आठवडाभरापासुन हे चित्र पहावयास मिळत आहे. यात बांधकाम मिस्त्री, छोटे ठेकेदार, सुतार, पेंटर, प्लंबर, बांधकाम मजुर (बिगारी) या कारागीरांची मजुर अड्डयावरची कामासाठी गर्दी वाढली आहे. पेंटींग व्यवसाय बांधकाम साईट ठप्प असल्याने कामे मंदावली आहेत. जुन ते ऑगस्ट दरम्यान या हंगामात घरगुती रंगाची कामेही कुणी नागरीक सर्रास कामे करून घेत नसल्याने पेंटींग व्यवसाय व संबंधित कामगारांची या काळात कामासाठी ओढाताण असते. गणपती उत्सव, दसरा, दिवाळीत हीच कारागीर मंडळींची नागरीकांना शोधाशोध करावी लागते. या उत्सवाच्या काळात मागणी वाढल्याने यांचा भावही वधारलेला असतो. बांधकाम गवंडी व त्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांचे ही या सप्ताहात हाताला काम नसल्याने हाल होतानेचे चित्र मजुर अड्ड्यावर पहावयास मिळत आहे. कुणी एक ठेकेदार मजुर अड्ड्यावर आला की त्याच्या पाठीमागे मजुरांचा घोळका कामाची विचारणा करताना दिसत आहे. रोजंदारीवर आठवड्याला व दैनंदिन कामाचा रोजचा पगार घेणाऱ्या मजुरांना काम द्या म्हणुन ठेकेदारांच्या विनवण्या करतानाचे चित्र सध्या जुनी सांगवी मजुर अड्ड्यावर दिसत आहे.

गेली आठ दिवसांपासुन रोज नाक्यावर कामाच्या आशेवर येतो.पण काम मिळत नाही.साईट बंद असल्याचे ठेकेदार सांगतात.नाईलाजाने घरी जावे लागते. - चंद्रप्पा राठोड, बांधकाम मजुर

या नाक्यावर जवळपास तिनशे कामगार गेली आठवडाभरापासुन रोज जमतात. रोज काम नसल्याने गर्दी वाढत आहे. गेली पंधरादिवसापासुन काम नाही. - गोविंद पवार, बांधकाम मिस्री

पावसाळ्यात पेंटींग कामे कमी असतात. नाक्यावर अवलंबुन राहावे लागते. - समिर पेंटर

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: The construction business has stopped due to the rain