दांपत्यास साडेचार कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

बांधकाम प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यास एका वर्षात ५० टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दांपत्यास एका बांधकाम कंपनीने तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातला.

पुणे - बांधकाम प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यास एका वर्षात ५० टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दांपत्यास एका बांधकाम कंपनीने तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी संबंधित बांधकाम कंपनीच्या संचालकासह त्याच्या पत्नीविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी बकुल पुनीत सिंग-जैन (वय ३५, रा. कल्याणीनगर) यांनी कोरेगाव पार्क ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून नीलेश सिंग व मीनाक्षी सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बकुल सिंग या येरवडा येथील नामांकित आयटी कंपनीमध्ये टेक्‍निकल आर्किटेक्‍ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पती पुनीत येथे कंपनीत आहेत. पुनीत हे अमेरिकेमध्ये काम करीत होते. त्या वेळी त्यांची अभिनंदन भारद्वाजशी ओळख झाली. २०१६ मध्ये अभिनंदन यांच्यामार्फत पुनीत व नीलेश यांची ओळख झाली. पुण्यामध्ये आपली बांधकाम कंपनी असून, तुम्ही गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, असे नीलेशने पुनीतला सांगितले. त्यानुसार पुनीत व बकुल सिंग यांनी नीलेश व त्याची पत्नी मीनाक्षी सिंग यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक        करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी एक कोटी आठ लाख, त्यानंतर पतीने ६२ लाख तसेच त्यांच्या एका कंपनीचे सहा लाख अशी एक कोटी ७६ लाखांची रक्कम नीलेश व मीनाक्षी यांच्या कंपनीस दिली. त्याचे एका वर्षात ५० टक्के व ३६ टक्के फायद्याप्रमाणे चार कोटी तीस लाख ४४ हजार आणि पुनीत यांनी नीलेश सिंग यांच्या प्रकल्पांवर केलेल्या कामाचे २३ लाख, अशी एकूण चार कोटी ५३ लाखांची फसवणूक केली.

Web Title: A construction company has cheated a couple