Pune News : रात्री कामे करणे सोईचे; बांधकाम व्यावसायिकांची भावना

पुणे शहरात रात्री-अपरात्री बांधकाम सुरू ठेवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागतो.
Night Construction
Night ConstructionSakal

पुणे - घरे मुदतीत बांधण्यासाठी ‘महारेरा’चे असलेले बंधन, शहरातील वाहतुकीचा विचार करता बांधकामाच्या ठिकाणी साहित्य पोचविण्यासाठी लागणारी कसरत, पोलिस, महापालिका प्रशासन, स्थानिक मंडळींचा त्रास अशा अनेक गोष्टींवर मात करीत बांधकाम करावे लागते. अडचणी शंभर आणि नियम पाळा म्हणता, असे कसे चालेल साहेब...असा प्रश्‍न आहे बांधकाम व्यावसायिकांचा.

शहरात रात्री-अपरात्री बांधकाम सुरू ठेवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागतो. अशा तक्रारींचे प्रमाण वाढत चालले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांची बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची विचारलेला हा प्रश्‍न.

महत्त्वाचा प्रश्‍न

रात्रीची कामे सुरू ठेवली, तर नागरिकांना त्रास होतो. विनाकारण कोणाला त्रास देणे ही आमची भूमिका नसते. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली असते. विक्री झाली नाही, वेळेत काम पूर्ण केले नाही, तर व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागतो. या अडचणीचा विचार कोण करतो का, असा प्रश्‍न एका व्यावसायिकाने मांडला.

काय आहे म्हणणे?

  • पुणे शहरात कुठेही बांधकाम करायाचे झाले, तर महापालिकेची परवानगी घ्यावी लागते

  • सर्व प्रक्रिया पूर्ण करून परवानगी मिळविण्यात आमचा वेळ वाया जातो

  • बांधकाम सुरू करण्याचा दाखल हाती पडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी लागते

  • त्यानंतर ‘महारेरा’कडे हे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण करणार हे लेखी द्यावे लागते

  • वेळ पाळली नाही, तर ग्राहकांकडून तक्रारीची होण्याची भीती, मुख्य रस्त्यापासून आड बाजूला बांधकाम असेल, तर बांधकाम साहित्य साइटवर पोचविण्यासाठी करावी लागणारी कसरत अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो

  • थोडी चूक झाली तर पोलिस नाही तर महापालिकेकडे तक्रार होते, त्यातून बाहेर पडण्यासाठी काय कसरत करावी लागते.

अशा आहेत अडचणी

  • महापालिकेकडून स्लॅब भरण्यासाठी रेडीमिक्स क्राँक्रीट वापरण्याचा आग्रह धरला जातो

  • कारखान्यातून गाडी निघाल्यानंतर तीन ते साडेतीन तासांमध्ये त्याचा वापर केला नाही, तर त्यांची स्ट्रेंथ कमी होते. नाही तर मोठे आर्थिक नुकसान होते

  • शहरातील वाहतूक, काही रस्त्यावर दिवसा जड वाहनांना असलेली बंदी, पोलिसांकडून होणारी अडवणूक अशा अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो

  • बांधकाम करण्यापूर्वी खोदाई करावी लागते. त्यातून निर्माण होणारा राडारोडा महापालिकेने ठरवून दिलेल्या वाघोलीच्या खाणीवर नेऊन टाकावा लागतो

  • दिवसा डंपर आणता येत नाही, रस्त्यावर उभे करता येत नाही, केले तर पोलिसांचा त्रास

  • या सर्व गोष्टींचा विचार केला, तर रात्रीच्या वेळेस ही कामे करणे सोईचे ठरते

  • खोदाई अथवा स्लॅब भरण्यासाठीचे कामे सोडली, अन्य कामे दिवसा पूर्ण करता येतात

कोथरूड परिसरात पुनर्विकासाचे काम सुरू आहे. साइटवरील सर्व कामे आमच्या कार्यकर्त्यालाच द्या, असा तेथील लोकप्रतिनिधींचा आग्रह असतो. त्यांनी चूक केली, तर त्यांना विचारता येत नाही, जाब आम्हाला द्यावा लागतो. दरमहा पोलिसांना सांभाळावे लगते. त्यांचे काम वेळेत केले नाही, तर ते साइटवर येऊन दम देऊ जातात. या व्यतिरिक्त बांधकाम परिसरात येणाऱ्या मंडळांचा त्रास वेगळाच. अनेक अडचणी सांभाळावे लागतात.

- एक बांधकाम व्यावसायिक.

स्लॅब आणि खोदाई सोडली, तर सर्व कामे दिवसा आम्ही करतो. करण मोठा स्लॅब असला, तर दहा बारा गाड्या रेडीमिक्स क्राँक्रिटच्या एकावेळेस साइटवर येतात. मालाचा वापर लगेच केला नाही, तर कडक होण्याची भीती असते. गर्दीच्या वेळेस हे करता येत नाही. खोदाई केल्यानंतर जागेवर डबर लगेच न्यावे लागते. ठेवण्यासाठी जागा नसते. त्यामुळे ही कामे रात्री करण्याशिवाय अनेकदा पर्याय नसतो. नागरिकांना त्रास होतो, हे मान्य आहे. परंतु या गोष्टींना काही पर्याय देखील नाही. त्यातही शक्यतो रात्री उशिरापर्यंत काम सुरू न ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो.

- एक बांधकाम व्यावसायिक, कंपनीचे व्यवस्थापक

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com