Pune : लग्नपत्रिकांचा खप वाढू लागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PUNE

लग्नपत्रिकांचा खप वाढू लागला

स्वारगेट : दिवाळीनंतर आलेल्या लग्नसराईमुळे पत्रिकेच्या बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. हॅन्डमेड, मेटॅलिक, टेक्श्चर, आर्ट या पेपरपासून बनवलेल्या टू फॉल्ड, थ्री फोल्ड, लखोटा, फॅन्सी, सिंगल कार्ड, बॉक्सटाइप या पत्रिका खरेदी करण्यास शहरी ग्राहकांनी पसंती असून, पारंपरिक पद्धतीच्या पत्रिका ग्रामीण भागातील ग्राहक खरेदी करीत आहेत.

लग्नसराईबरोबरच बारसे, वाढदिवस यासाठीही पत्रिका तयार करण्याचा ट्रेंड वाढता असल्याचे व्यावसायिकांचे निरीक्षण आहे. पत्रिका खरेदी करताना नाविन्यपूर्ण डिझाइन आणि फॅन्सी पत्रिकांना ग्राहकांची पसंती आहे. ई-मेल, व्हॉट्सॲपद्वारे कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचा ट्रेंड असला तरी, प्रत्यक्ष भेटून आमंत्रण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे पत्रिकांना मागणी असतेच. त्यातच आता लखोटापद्धतीच्या पत्रिकांना गेल्या काही दिवसांपासून मागणी वाढत आहे. ग्राहक ३०० ते २ हजारांपर्यंत पत्रिका तयार करून घेतात.

त्यासाठी आकर्षक पाकिटांचीही मागणी केली जाते. या पत्रिका टपाल खाते तसेच कुरिअर व्यावसायिकांकडून प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोचविल्या जातात. शहरातील अप्पा बळवंत चौक परिसरात पत्रिका व्यावसायिकांची मोठी बाजारपेठ आहे. मराठीबरोबरच अन्य भाषांमधील पत्रिकाही तेथे तयार केल्या जातात. ५ रुपयांपासून ते १००-१५० प्रती पत्रिका सरासरी दरात उपलब्ध आहेत. तसेच हौशी ग्राहक खर्चाचे बंधन ठेवत नाहीत. त्यामुळे बरेचदा ३०० ते ५०० रुपयांपर्यंतची पत्रिकाही तयार करून घेतली जाते.

हेही वाचा: 'हम निकल पडे...' CM योगींसोबत PM मोदींचा 'दोस्ताना'

वेगवेगळ्या डिझाइनच्या बॉक्सटाइप पत्रिकेला बाजारात मोठी मागणी असून, यामध्ये पॅडिंग आणि नॉन पॅडिंग असे दोन प्रकार असतात. पॅडिंगमध्ये वेगवेगळे कलर, पारंपरिक फीचर्स, विविध प्रकारचे डिझाइन, पत्रिकेतील मजकुरानुसार बॉक्सपत्रिकेतील इनर ठरवले जाते. दिवाळीनिमित्त मिठाई, ड्रायफूट भेट ठेवण्यासाठी या बॉक्सपत्रिका वापरतात. या पत्रिका गुजराती, राजस्थानी, महाराष्ट्रीयन पॅटर्ननुसार तयार केल्या जातात. तसेच ग्राहकांच्या पसंतीनुसार बॉक्सपत्रिका बनवल्या जातात, असेही व्यावसायिकांनी सांगितले.

एकमेकांना पत्रिका देणे ही आपल्या संस्कृतीतील प्रथा आहे. त्यामध्ये लग्नाला बोलावण्याची आपुलकी वाटते. पत्रिकेच्या खरेदीची संख्या कमी केली आहे. पण जास्त किमतीच्या आणि फॅन्सी पत्रिकेच्या खरेदीला आम्ही पसंती दिली आहे.

- अनिल घोडके, ग्राहक

पत्रिका विकत घेण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले असले, डिझाइन आणि फॅन्सी पत्रिकेसाठी जास्त पैसे खर्च करण्याची ग्राहकांची मानसिकता आहे.

- युवराज गोरे, पत्रिका व्यावसायिक

देवदेवतांची छायाचित्रे असलेल्या पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या पत्रिकांची मागणी कायम असून, वधूवरांचे चित्र असेलल्या पत्रिका ग्रामीण भागातील ग्राहक आवर्जून खरेदी करतात.

केदार कात्रे, पत्रिका व्यावसायिक

loading image
go to top