बाप रे, कोरोनाने मृत्यू झालेल्या शिरूरमधील कामगाराचा 58 जणांशी संपर्क

corona
corona
Updated on

शिरूर (पुणे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीतील मोठ्या कंपनीतील कोरोनाबाधित कामगाराच्या मृत्यूमुळे औद्योगिक पट्ट्यात खळबळ उडाली आहे. मृत हडपसरचा असला; तरी कोरोनाची लागण झाल्याच्या काळात तो कामावर येत असल्याचा संशय असल्याने शिरूरकरांची व विशेषतः उद्योग क्षेत्राची झोप उडाली आहे.

मृत कामगार गेल्या आठवड्यात तीन दिवस कामाला आला होता. त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता मंगळवारी (ता. 26) त्याचा मृत्यु झाला. दरम्यान, त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली. 

या कोरोनाबाधितासह कंपनीत काम करणाऱ्या; तसेच तो ज्या बसमधून येत- जात होता, त्या बसमधील सहप्रवासी असलेल्या 58 कामगारांना कुटुंबीयांसह क्वारंटाइन केले आहे. त्यात शिरूर शहर, पंचक्रोशी व तालुक्‍यातील काही गावातील कामगारांचा समावेश असल्याने शिरूर परिसराची काळजी वाढली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सोमवारपासून (ता. 18) हा कामगार कामाला येत होता. कंपनीतील मेंटनन्स विभागात त्याच्यासमवेत दहा जण काम करीत होते. कॅंटीनमध्ये तो सहकाऱ्यांसमवेत जेवायलाही जात होता. त्यामुळे या सर्वांची चिंता वाढली आहे. 


प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांनी शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्यासह काल रात्री उशिरा प्रशासनाशी चर्चा करून कंपनी बेमुदत काळासाठी बंद केली. कंपनीतील सर्व कामगारांचे वैद्यकीय तपासणी केली जाईल. त्याचे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतरच कंपनी सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे प्रांताधिकारी देशमुख यांनी सांगितले.

रांजणगाव एमआयडीसीतील बहुतेक सर्व कंपन्या सुरू झाल्या असल्या; तरी पुरेशा कामगारांअभावी पूर्ण क्षमतेने उत्पादन प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. खबरदारीच्या उपाययोजना राबवूनच काही अटी व शर्तींवर कंपन्या सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली असून, यात मास्क, प्रवेशद्‌वारावर सॅनिटायझर व कंपनीत सोशल डिस्टनसिंगची अंमलबजावणी सक्तीची केली असून, रेड झोनमधील कामगारांना नो एंट्री आहे. तरीही अनेक मोठ्या कंपन्यांतून आजही धोकादायक परिसरातून कामगार येत असल्याच्या इतर कामगारांच्या तक्रारी आहेत.

शासनाने याबाबत बजावलेल्या नोटिशींना अनेक अनेक कंपन्यांनी केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. मृत कामगार देखील रेड झोनमधूनच कंपनीच्या बसमधून इतर सहकाऱ्यांसमवेत येत असल्याचे समजते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Board SSC HSC Exam 2027 Check Class 10 and 12 Written Exam Dates Practical Exams and Internal Assessment
Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com